पोलीस उपनिरीक्षकाची गोदावरी नदीत उडी, मात्र माजी सैनिकामुळे अनर्थ टळला
शेषराव राठोड हे नांदेड पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेला केवळ चार महिनेच बाकी आहेत. गुरुवारी ड्युटीवरुन घरी परतत असताना गोदावरी नदीवरील गोवर्धन घाट उड्डानपुलावरुन त्यांनी उडी घेतली.
नांदेड : ड्युटीवरुन घरी परतत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. शेषराव राठोड असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. माजी सैनिकामुळे शेषराव यांना वाचवण्यास यश आले आहे. दरम्यान, शेषराव यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. बचावण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सेवेला चार महिनेच बाकी असताना आत्महत्येचा प्रयत्न
शेषराव राठोड हे नांदेड पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेला केवळ चार महिनेच बाकी आहेत. गुरुवारी ड्युटीवरुन घरी परतत असताना गोदावरी नदीवरील गोवर्धन घाट उड्डानपुलावरुन त्यांनी उडी घेतली.
पोलीस गणवेशातच घेतली उडी
शेषराव यांनी पोलीस गणवेशातच नदीत उडी घेतली. यावेळी गोवर्धन घाट उड्डानपुलावर उपस्थित अनेक लोकांनी त्यांनी नदीत उडी घेताना पाहिले. पाण्यात ते तडफडत असताना एका माजी सैनिकाने पाहिले.
माजी सैनिकांनी अन्य लोकांच्या मदतीने वाचवले प्राण
माजी सैनिक असलेले बलजितसिंग बावरी यांनी अन्य लोकांच्या मदतीने शेषराव यांना पाण्यातून बाहेर काढले. रुग्णवाहिका यायला उशीर होत असल्याने बावरी आणि अन्य लोकांनी त्यांना तात्काळ रिक्षातून श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
नांदेड पोलीस दलात खळबळ
राठोड यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सेवेला केवळ चार महिने बाकी असताना पोलीस उपनिरीक्षकाने असा आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेने मात्र नांदेड पोलीस दलात खळळ उडाली आहे.