एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 21 वर्षांनी कुटुंबात पाळणा हालणार होता, गर्भवती महिला…
पूजा मोराणकर शुक्रवारी सकाळी घरातील काम करीत होत्या, काम आवारत असतांना त्या बाथरूममध्ये गेल्या, बाथरूममधून त्या बाहेर आल्या आणि त्यांना भोवळ आली.
नाशिक : काही कुटुंबात अनेक वर्षांनी पाळणा हालणार असतो, सगळीकडे आनंदाचे वातावरण असतं, पण अचानक होतं की कल्पना सुद्धा करवत नाही अशी घटना नाशिकमध्ये ( Nashik News ) घडली आहे. गर्भवती असेलेल्या महिलेचा मृत्यू ( Pregnant Woman Death ) झाला आहे. तिच्या गर्भात असलेल्या दोन जुळ्या बाळांचा देखील मृत्यू झाला आहे. भोवळ येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पूजा मोराणकर असं मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. इंदिरानगर पोलीस ( Nashik Police ) ठाण्यात याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महिला गर्भवती असतांना तिला अचानक आलेली भोवळ तिच्या मृत्यूचे कारण बनलंय. त्यात महिलेच्या गर्भात दोन बाळांचा समावेश होता. तब्बल 21 वर्षांनी घरात पाळणा हालणार असल्याने आनंदाचे वातावरण होते, मात्र महिलेच्या मृत्यूनं काही क्षणातच त्यावर विरजण पडले. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशी घडली घटना-
पूजा मोराणकर शुक्रवारी सकाळी घरातील काम करीत होत्या, काम आवारत असतांना त्या बाथरूममध्ये गेल्या, बाथरूममधून त्या बाहेर आल्या आणि त्यांना भोवळ आली. पूजा या लागलीच जमिनीवर कोसळल्या. त्या पडल्याचा आवाज आल्याने घरात असलेले वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहीण होती. त्यांनी लागलीच त्यांना उठवून दवाखान्यात नेण्याची हालचाल केली.
उपचारासाठी जात असतांना दुसऱ्यांदा भोवळ-
पूजा यांना भोवळ आल्याचे पाहून वडिलांनी आणि बहिण यांनी पूजा यांना पाथर्डी फाटा येथील वक्रतुंड रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाच्या पायऱ्या चढत असतांना दुसऱ्यांदा भोवळ आली. त्या पुन्हा जागीच कोसळल्या. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला असून त्यांच्या गर्भात असलेल्या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय पूजा यांचा मृत्यू झाला आहे.
सर्वत्र व्यक्त होतेय हळहळ-
पूजा मोराणकर यांना लग्नाच्या 21 वर्षांनी बाळ होणार होते. त्यामध्ये दोन जुळ्या बाळांना पूजा जन्म देणार होत्या. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच पूजा यांना भोवळ आल्याने त्या दोनदा जमिनीवर कोसळल्या त्यामध्ये त्यांच्यासहित गर्भातील बाळांचा मृत्यू झाला आहे. मोराणकर आणि पाखले कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पूजा मोराणकर या महिलेच्या मृत्यूनंतर गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.