Maharashtra Budget 2023 : आता हॉस्पिटलचं बील वाढलं तरी नो टेन्शन, राज्य सरकारची मोठी घोषणा, सर्वसामांन्यांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेअंतर्गत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येतील अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई : राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेतील 1.50 लाखांचे असणारे विमा संरक्षण वाढवून 5 लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासनभेत केली. तत्पूर्वी विधानसभेत आमदार राहुल पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीला सूचनेला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनीही या घोषणेचे सूतोवाच केले होते.
डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना राज्यातील गोर-गरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत आयुर्वेद उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. पण, आयुर्वेद उपचार पद्धतीचे समावेश शासनाच्या कोणत्याही आरोग्य योजनेमध्ये नसल्यामुळे आयुर्वेद उपचार घेणाऱ्या रुग्णांची आर्थिक कुचंबना होत आहे याकडे आरोग्यमंत्र्याचे लक्ष वेधले होते.
त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचार सामायिक आहेत. प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यासाठी अतिरिक्त २१३ उपचार मिळून एकुण १२०९ उपचार समाविष्ट आहेत. योजना सुरु झाल्यापासून आजपर्यंत अॅलोपॅथीमधील वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया यांच्या सहाय्याने रुग्णांना वैद्यकीय लाभ दिला जात आहे. २ जुलै २०१२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ५१,९०,००० उपचार आणि १०३३० कोटी रकमेचे दावे अदा करण्यात आल्याची माहिती दिली.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काही राज्यांमध्ये आठ लाख, काही राज्यामध्ये दहा लाख, काही राज्यांमध्ये 25 लाख इतकी मदत देण्यात येते. मात्र, आपल्या राज्यात केवळ दीड लाख इतकीच मदत देण्यात येते. त्यामुळे सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन हि रक्कम पाच लोक इतकी करण्यात येत असल्याची घोषणा केली होती.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पातून तानाजी सावंत यांच्या या घोषणेला दुजोरा दिला. फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत मर्यादा वाढविण्यात आल्याची घोषणा केली. तसेच या योजनेत नवीन 200 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती दिली.