खेळताना फुगा श्वास नलिकेत अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू, कुठे घडली ही दुर्दैवी घटना ?
आयुष्य अतिशय बेभरवशी आहे. कधी, कोणत्या क्षणी काय होऊन बसेल सांगता येत नाही. हे अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली. फुगा श्वास नलिकेत अडकून अवघ्या तीन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : आयुष्य अतिशय बेभरवशी आहे. कधी, कोणत्या क्षणी काय होऊन बसेल सांगता येत नाही. हे अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली. फुगा श्वास नलिकेत अडकून अवघ्या तीन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्याने त्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला. पालघरमधील (Palghar) वाडा तालुक्यात ही अतिशय दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली. काही वेळापूर्वीच घराबाहेर आपल्या मित्रांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्याच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या घरावर, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या वाडा तालुक्यात राहणारा हा तीन वर्षांचा मुलगा संध्याकाळी मित्रासोबत खेळत होता. मात्र अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे घरातले सगळे घाबरले. त्याला काय होतंय विचारू लागले. तेव्हा, त्याने खेळता-खेळता फुगा गिळल्याने त्याची तब्येत बिघडली, अस त्याच्या एका मित्राने सांगितलं. हे ऐकताच घरात एकच गोंधळ माजला. त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने तेथे त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
वेळेवर उपचार होऊ न शकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यासंदर्भात अजून कोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच लहान मुलं खेळताना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या, ते कोणतीही गोष्ट तोंडात टाकत नाहीत ना हे तपासा, असे आवाहनही करण्यात येत आहे.