दिवाळीत लहवित गावावर शोककळा, महाराष्ट्राच्या सुपुत्राला सीमेवर वीरमरण
संतोष गायकवाड यांच्या थेट मेंदूवर थंडीचा परिणाम झाल्यानं त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात हालवण्यात आले होते. तिथे त्यांच्या मेंदूवर शस्रक्रिया देखील करण्यात आली.
Nashik News : नाशिकच्या लहवित (Nashik Lahvit) गावावर ऐन दिवाळीत दुखाचा डोंगर कोसळला आहे. आसामच्या (Asam) सीमावर्ती भागात कर्तव्यावर असलेल्या नाशिकच्या लहवित गावातील संतोष गायकवाड यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना अचानक दुखद बातमी समोर आली आहे. गायकवाड यांच्या मूळ गावी लहवित त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे. लान्सनायक संतोष गायकवाड हे आसाम येथे कर्तव्य बजावत होते. गायकवाड हे तोफखाना केंद्राच्या 285 मिडियम रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. आसाम येथे गायकवाड लंका नावाच्या पोस्ट वर कर्तव्य बजावत होते. अती थंडीचा त्रास झाल्याने संतोष गायकवाड यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे.
गायकवाड जिथे कर्तव्य बजावत होते तो सिक्कीमच्या उत्तरेकडील हा भाग उंचावर असल्यानं सातत्यानं बर्फाच्छादित राहतो.
उणे १५ डिग्री तापमान असणाऱ्या इथल्या हाड गोठवणाऱ्या थंडीत भारताच्या सीमेचं संरक्षण करत असताना संतोष गायकवाड यांना अतिथंडीचा त्रास झाला.
संतोष गायकवाड यांच्या थेट मेंदूवर थंडीचा परिणाम झाल्यानं त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात हालवण्यात आले होते. तिथे त्यांच्या मेंदूवर शस्रक्रिया देखील करण्यात आली.
गावात दिवाळीचा उत्सव सुरू असतांना गायकवाड शहीद झाल्याची बातमी आल्याने गायकवाड कुटुंबीय शोकसागरात बुडाले असून गावावर शोककळा पसरली आहे.