राजीव गिरी, नांदेड : आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी घडत असतात. कुणी समाज म्हणून त्या घटनांच्या जवळ जातात तर कुणी दुरवरूनच पळ काढतात. एखादं कुटुंब, एखादा व्यक्ती कुणाचे वाद सुरु असतात, कुणाला मदत हवी असते, पण नेमका काय प्रकार आहे, हे तिथे जाऊन पाहण्याची, तो प्रश्न समजुतीने सोडवण्याची तसदी आपल्यापैकी फार कमीजण घेतात. नांदेडमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय. गस्तीवर असलेला तो अधिकारी रात्री चहा पित होता. इतक्यात त्याच्या कानावर काहीतरी प्रकार पडला. कुणीतरी विनवण्या करू लागलं. ऑटो रिक्षात बसून कुठेतरी जायचं होतं. पण ऑटो रिक्षा चालकाने नकार दिला. तो निघून गेला. त्या लोकांची आणि रिक्षा चालकांचं बोलणं ऐकून या अधिकाऱ्याने तत्काळ चहाचा कप बाजूला ठेवला आणि तडक तिथवर पोहोचला.
“रात्रीचा अंधार,सुटलेला वारा वादळ, आणि विजांचा कडकडाट. रात्रीचे पावणेदोन वाजताची ही घटना आहे. लातूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जवान गस्तीवर असताना जांब (बु.) तालुका मुखेड बसस्टँडवर एका हॉटेलवर चहा घेत होते. दरम्यान दोन महिला एका ऑटो चालकाला काकुळतीने विनवणी करत होत्या “दादा ऐका ना हो ..आमची बाई बाळंतपणासाठी व्हिवळत आहे ..
आम्हाला दवाखान्यात सोडा ना”.. यावर ऑटो चालकाने कुठलीही दाद न दिली नाही. तो सुसाट गेला. त्या दोन महिला दुसरं वाहन मिळतंय का हे पाहत होत्या. हा सगळा प्रसंग गस्तीवर असलेले राज्य उत्पादन शुल्क विभाग लातूर निरीक्षक आर.एस.चाटे,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले,आणि जवान संतोष केंद्रे यांच्या नजरेला पडला.
त्यांनी तातडीने वेळ आणि प्रसंग ओळखला. हातातला चहा झटक्यात खाली ठेवला अन् त्या महिलेकडे गेले. नेमका काय प्रकार आहे, याची विचारपूस केली. त्या महिलांनी हकिगत सांगितली.
आमच्या घरात एक महिला गरोदर आहे. तिला प्रसवेदना होत आहेत. तिला लगेच दवाखान्यात न्यावे लागणार आहे. “साहेब काय करावे एकही गाडी ऑटो मिळत नाही व थांबत नाही बघा” यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर.एस.चाटे,आणि गणेश गोले,यांनी तातडीने त्या महिलांना सोबत घेऊन आपले वाहन त्या महिलेच्या घरा घरासमोर नेवून उभे केले. महिलेला वाहनात घेत ते जांब येथील मुखेडच्या दिशेने निघाले.
प्रसवेदनेने व्हिवळत असलेल्या महिलेची प्रसूती गाडीमध्ये वाटेतच झाली आणि तिला सुपुत्र झाले. त्यांनी बाळंत महिलेला जांब (बु.) ता. मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी डॉ. माया कापसे यांनी तातडीने बाळंत महिला आणि बाळावर उपचार सुरु केले. बाळ आणि बाळंत महिलेची तब्येत उत्तम आहे. वेळेवर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने उपचारही करता आले असे डॉ.माया कापसे म्हणाल्या.
रात्रीच्या काळोख्यात,वारा वादळ आणि विजांचा कडकडाट,चालू असताना कर्तव्यावर असलेल्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविल्याने महिलेची प्रसुती सुखरूप झाली, याबद्दल लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी त्यांचा सत्कार केला.
सदर महिलेने सकाळीच मुखेड येथील आरोग्य केंद्रात तपासणी केली होती. तिला 24 तासात डिलिव्हरी होईल म्हणून सांगण्यात आले होते. मात्र रात्रीचा मुक्काम नातेवाईकाकडे करून पुन्हा सकाळी यावे, असा विचार करून महिला घरी गेली होती. मात्र रात्रीतूनच प्रसवकळा सुरु झाल्याने हा जीवघेणा प्रसंग ओढवला. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी मदत केली अन् आता बाळ-बाळंतीन सुखरूप आहेत.