अमरावती | 5 नोव्हेंबर 2023 : अमरावती शहरातील वर्दळीच्या चौकात बेशिस्त वाहतूकीचा फटका एका महिला पोलिस अधिकाऱ्याला बसला आहे. आपल्या दुचाकीवरुन सकाळी कर्तव्यावर निघालेल्या एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात या महिला पोलीस गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, हा अपघात अमरावतील बियाणी चौकात घडला असून यात या महिला पोलिसाचा निकामी झाल्याने खळबळ उडाली आहे.
अमरावतीतील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका कोठेवार या दुचाकीवरुन सकाळी दहा वाजता आपल्या ड्यूटीवर जात असताना बियाणी चौकात त्यांच्या वाहनाला रेतीच्या ट्रकने जोराने धडक दिली. या अपघातात त्यांच्या एक्टीवा क्रमांक MH 27 BN 4714 ला ट्रकने ठोकल्याने कोठेवार यांच्या पायावरुन चाक केल्याने त्यांचा पाय वेगळा झाला. त्यांची एक्टीवा स्कूटर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आल्याने हा भीषण अपघात घडला. गणवेशात असलेल्या कोठेवार या राजापेठ पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असून त्या तेथे जात असतानाच हा अपघात घडला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोठेवार यांना रस्त्यावरील पादचाऱ्यांनी तात्काळ एका रिक्षात घालून नजिकच्या लाहोटी रुग्णालयात नेले. या ट्रकच्या धडकेने त्यांच्या डाव्या पायाचा पंजा पूर्ण निखळून बाजूला पडला. त्यांच्या तातडीने शस्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेनंतर जमावाने ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अमरावती शहरात गौण खनिजांची ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणे बेकायदेशीर वाहतूक होत असते. अवजड वाहतूकीमुळे अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.