Devendra Fadnavis: तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहात?; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना सवाल
devendra fadnavis: मनसे ही भाजपची 'सी; टीम आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी केली होती. आदित्य यांच्या या टीकेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे.
मुंबई: मनसे ही भाजपची ‘सी; टीम आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी केली होती. आदित्य यांच्या या टीकेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी समाचार घेतला आहे. त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कितवी टीम आहात? तुम्ही एका पदासाठी कोणती टीम झाला आहात? एक मुख्यमंत्रीपद देऊन पक्षाची काय अवस्था केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावरही टीका केली. राऊतांनी वर्षभर असे अनेक हस्यास्पद आरोप सोमय्यांवर लावले आहेत. पण ते कुठलाच आरोप सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनी इतका प्रयत्न केला, पोलिसांवर दबाव आणला मात्र काही हाती लागलं नाही. चुकीची कारवाई कारता येणार नाही हे त्यांना सांगितले आहे. आता जे सुरू आहे, त्याचाच एक प्रयत्न आहे. ते आता पुढे काय करतील, कुठच्या कोर्टात जातील हे आम्हाला माहीत आहे. त्यांना काहीही करू देत भ्रष्टाचार बाहेर काढणं भाजप आणि किरीट सोमैय्या सोडणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडी सोबत जाण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्या राजकारण्याला विरोध केला म्हणून त्यांच्या मागे माणसं पाठवली. त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. त्यांना सोबत घेऊन संपवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. त्यांना हे कळलं. त्यांची प्रतिमा देखील मलीन करण्यात आली. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ते आमच्या विरोधात बोलतील तो त्यांचा प्रश्न आहे, असं फडणवीस म्हणाले.
तेव्हा घाबरलो नाही, आता काय घाबरणार
भारतीय जनता पार्टी लोकांची सेवा करत विस्तारत जाणारा पक्ष आहे. मुळातच पक्षाची निर्मिती राष्ट्रवादातून झाली आहे. भाजपा संघर्ष करत जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अनेकवेळा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला पण विचार संपला नाही. पक्षाकडे दोन जागा असताना घाबरलो नाही. आतातर 302 जागा आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी संघर्ष करावा लागेल
भारतीय जनता पक्ष समतेचा संदेश देत गरिबाच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष असल्याचे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे आमचं लक्ष्य आहे. केवळ सेक्युलरच्या नावाखाली विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करण्यापेक्षा देशातील गरिबांना सेवा देण्याचे काम भाजपा करत आहे. येणाऱ्या काळात शोषित आणि वंचितांसाठी विकासकामांच्या योजना आणून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. राज्यातील सध्याची परिस्थिती भयानक आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास जेलमध्ये डांबले जाते. घरे तोडली जातात. संस्कृती पायदळी तुडवली जातेय. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. यापुढे महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
महापालिकेतील घराणेशाही संपवा
मुंबईतील परिस्थिती विदारक असून मुंबई महापालिकेने कोविड काळात प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला. खऱ्या अर्थाने प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे काय ते महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड केले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यानी त्यावर चकार शब्द उच्चारला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळातील घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष करावा लागणार आहे असे सांगत मुंबई महानगरपालिकेतील घराणेशाहीचा पराभव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली महागाईविरोधात आंदोलन
NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी, राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…