रामराम, नमस्कार, आदाब, जय भीम करत जमवून घेतो, बाकीचे मंत्री बिडीला मोहताज; Abdul Sattarयांची तुफान फटकेबाजी
मला राष्ट्रवादीत विनायक मेटे (vinayak mete) यांच्याकडून त्यावेळी निरोप होता, मात्र काही गतिरोधक आले आणि मी इकडे आलो. अल्पसंख्याक राहून राजकारणात पुढं येणं एवढं सहज नसतं.
बीड: मला राष्ट्रवादीत विनायक मेटे (vinayak mete) यांच्याकडून त्यावेळी निरोप होता, मात्र काही गतिरोधक आले आणि मी इकडे आलो. अल्पसंख्याक राहून राजकारणात पुढं येणं एवढं सहज नसतं. राम राम, नमस्कार, आदाब, जय भीम करत मी ते जमवून घेतो, असं सांगतानाच बाकीचे राज्यमंत्री बिडीला मोहताज आहेत. मी कानात ही बिडी ठेवत नाही, अशी तुफान फटकेबाजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केली. निमित्त होतं. बीड य़ेतील जिल्हापरिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाचं. बीडच्या जिल्हा परिषदेचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) आणि अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा परिषदेवर प्रशासक लागण्या आधीच हे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी सत्तार यांनी ही फटकेबाजी केली. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे एकाच मंचावर आले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
मी पुन्हा येईन असं म्हणनार नाही, कर्तबगार लोक निवडून येतातच, असं अब्दुल सत्तार म्हणाले. शिवसेनेत जाता जाता मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेतला. मी भाजपमध्ये जाणार होतो, मात्र शिवसेनेत आलो. सत्तार नावातील र काढल्यास सत्ता होईल. कधी कधी राजकारणात मॅच फिक्सिंग करावी लागते, असं सत्तार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली,.
लगाम मुंडेंचीच असते
धनंजय मुंडे टायगर आहेत. निवडणूक हारून देखील ते टायगर राहिले. धनंजय मुंडे यांनी मला खूप मदत केली. घोडा कुठलाही असला तरी लगाम मुंडेंचीच असते, असंही सत्तार यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्याची वाट लावू नका
आजचा दिवस हा माझ्या स्वप्नपूर्तीचा आहे. आठ वर्षे मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. मात्र मला अध्यक्ष होता आले नाही. देव करतो ते भल्यासाठीच. आज कार्यक्रमाला विनायक मेटे आले आहेत. असं व्यासपीठ बीडमध्ये पाहावयास मिळत नाही. विकासाच्या कामांसाठी एकत्र येऊन एका व्यासपीठावर बसून विकासाची घडी बसविणे गरजेचे आहे, असं आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. मेटे साहेबांचा वेगळा पक्ष असला तरीही आमदार म्हणून ते भाजपचेच आहेत. नामांकन अर्जावर भाजप म्हणून लिहिलेले मी पाहिले आहे. येणाऱ्या काळात जे निवडून येतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जिल्हा परिषदेत माणूस रमला की रमलाच. आमची तळमळ बीड जिल्ह्याच्या विकासाठी आहे. यात कोणीही यावं आणि विकासाच्या वाट्यात सहभागी व्हावं, बीड जिल्ह्याची वाट लावू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया भाजपला झाला, राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकरांना सडेतोड प्रत्युत्तर
Nashik | जलील यांनी MIM चा राजीनामा देऊन NCP मध्ये यावं, भुजबळांचं थेट आवतण