राज्यातील माजी मंत्र्याच्या गाडीला डंपरची धडक, मानेला व पाठीला दुखापत झाल्याने रुग्णालयात केलं दाखल
डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरनं जबर धडक दिल्याने गाडीच्या मागील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला आहे, डॉ. दीपक सावंत यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला व पाठीला इजा झाली असून त्यांच्यावर अंधेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉ. दीपक सावंत हे सकाळच्या दरम्यान काशिमीरा येथून पालघरच्या दिशेने जातांना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरनं जबर धडक दिली आहे. यामध्ये डंपरच्या धडकेने गाडीच्या मागील बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच रस्त्याने जाणाऱ्या-नागरिकांनी थांबून मदत सुरू केली होती. रुग्णवाहिका बोलावून डॉ. दीपक सावंत यांना उपचारासाठी अंधेरीच्या दिशेने रवाना केले होते. तर दुसरींकडे हा अपघात कसा याबाबत माहिती समोर आली नसली तरी पाठीमागील बाजून हे धडक दिल्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला व पाठीला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींच्या वाहनांचा अपघात होण्याची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार जयकुमार गोरे, योगेश कदम, बाळासाहेब थोरात यांच्या वाहनाला अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहे.
तर स्व. विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करू नये असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केले होते.
एकूणच काय तर अपघाताच्या नंतर घातपात झाल्याची शक्यताही वर्तवली जाते, तर्क वितर्क लावून चौकशीची मागणी केली जाते, डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीची स्थिती बघितली तर गंभीर आहे त्यामुळे घातपाताचा संशय बळावला जात आहे.
डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरनं जबर धडक दिल्याने गाडीच्या मागील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला आहे, डॉ. दीपक सावंत यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे.