पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय हा शिरूर येथील गावातील शेतात लपला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. तो शोध गावातच लपल्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर तो गावातून पळू नये म्हणून गावात 100 पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. डॉग स्क्वायड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. अखेर 72 तासानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला शिरूर, पुणे येथून अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा तो कोणाच्या तरी घरी जेवायला गेला होता, त्याच व्यक्तीने त्याची माहिती पोलिसांना दिली. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपीवर यापूर्वी देखील अनेक आरोप झाले आहेत. आरोपी गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. आरोपी गेल्या दोन दिवसांपासून फरार होता.
फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केलं होतं. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यातील स्वारगेट हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सर्वात मोठ्या बस डेपोंपैकी एक आहे. त्याठिकाणीच मंगळवारी पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील फलटण येथील स्टँडवर बसची वाट पाहत असल्याचे पीडितेने सांगितलं. आरोपीने पीडितेला ‘दीदी’ म्हणत दुसऱ्या बस स्डँडवर घेऊन गेला.
तेथे उभ्या असलेल्या ‘शिव शाही’ बसमध्ये आरोपाने पीडितेसोबत माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले की, त्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.