आधी बुके आणणाऱ्या अधिकाऱ्याला 5 हजार, आता पेन आणणाऱ्या नगरसेविकेला 500 रुपये दंड, प्लास्टिक बंदीसाठी औरंगाबाद आयुक्तांची कारवाई
अनेकदा शासन निर्णय घेतं मात्र त्याची अंमलबजावणी उच्च स्तरातील अधिकाऱ्यांकडून न झाल्याने असे निर्णय निकामी ठरतात. प्लास्टिक बंदीचा निर्णय देखील यातीलच एक आहे. मात्र, औरंगाबाद याला अपवाद होताना दिसत आहे (Aurangabad Commissioner on plastic ban).
औरंगाबाद : अनेकदा शासन निर्णय घेतं मात्र त्याची अंमलबजावणी उच्च स्तरातील अधिकाऱ्यांकडून न झाल्याने असे निर्णय निकामी ठरतात. प्लास्टिक बंदीचा निर्णय देखील यातीलच एक आहे. मात्र, औरंगाबाद याला अपवाद होताना दिसत आहे (Aurangabad Commissioner on plastic ban). सध्या औरंगाबादमध्ये महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची जोरदार चर्चा आहे. त्यांनी आपल्या कामाला स्वागताच्या दिवसापासूनच सुरुवात केली आहे. पांडे यांनी पहिल्यादिवसापासूनच प्लास्टिक बंदीबद्दल गांभीर्य दाखवत स्वागताला येणाऱ्या अधिकारी आणि नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे (Aurangabad Commissioner on plastic ban).
औरंगाबाद महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती झाली आहे. पांडे कामावर रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (10 डिसेंबर) येथील लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. नव्या आयुक्तांचे स्वागत करत असताना भाजप नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आयुक्तांना भेट स्वरुपात पेन दिला. मात्र, पेनाला प्लास्टिक कव्हर असल्यानं आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तात्काळ मुंडे यांना 500 रुपयांचा दंड लावला. त्यामुळे आयुक्त पांडेय सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे पालिकेचा पदभार स्वीकारताच पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी स्वागतासाठी आलेल्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक महाजन यांच्यावरही अशीच कारवाई केली होती. महाजन यांनी कॅरीबॅग असलेला पुष्पगुच्छ आणल्याने त्यांना 5 हजार रुपयांचा दंड केला होता. पहिल्या दिवशी रुजू झाल्यावर याबाबत विचारलं असता चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून सुरू करावी असं म्हणत पांडेय यांनी शहरात प्लास्टिक बंदी गांभीर्याने लागू होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे पहिल्या दिवशी अधिकाऱ्यावर झालेली कारवाई पाहून दुसऱ्या दिवशी स्वागताला आलेल्या नगरसेवकांनी थोडी खबरदारी घेतली. त्यापैकी काही नगरसेवकांनी पुस्तकं किंवा इतर काही गोष्टी दिल्या. मात्र नगरसेविका मनीषा मुंडे यांच्याकडून प्लास्टिक कव्हर असलेला पेन दिला गेल्याने त्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागला. नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आयुक्तांनी केलेला दंड भरला आहे. तसेच यापुढे काळजी घेऊ असंही आश्वासन दिलं.
औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांच्या या कार्यशैलीमुळे औरंगाबादच्या नागरिकांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. अशाचप्रकारे आयुक्तांनी कठोर निर्णय घेऊन शहराचा विकास करावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.