तो गांधीसुद्धा नाही, महात्मा गांधींच्या नखाचीही सर राहुल गांधींना नाही, शरद पोंक्षे यांचा घणाघात
राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेवरून सध्या राजकीय वातावरण तापलं असताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्या जीवनचरित्रातील काही गोष्टींवर सविस्तर भाष्य केलं.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्यावर टीका करणारे राहुल गांधी स्वतःला गांधी म्हणवतात. स्वतःची तुलना महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याशी करतात. पण सावरकर तर दूरच पण महात्मा गांधी यांच्या नखाचीही सर राहुल गांधींना येऊ शकणार नाही, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केली आहे. काँग्रेसने एवढी दाबून ठेवलेले पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हिंदु या शब्दाची सगळ्यांना दहशत बसली आहे. या दहशतीतून अशा प्रकारे मूर्खासारखं बरळणं सुरु आहे, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली. राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेवरून सध्या राजकीय वातावरण तापलं असताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्या जीवनचरित्रातील काही गोष्टींवर सविस्तर भाष्य केलं.
यांचं पोट का दुखतंय?
सावरकरांबाबत राहुल गांधी जे दावे करतात, त्या दयेच्या पत्राबाबत आम्ही वारंवार स्पष्टीकरण देऊन झालंय. पण ही झोपेची सोंग घेतलेली माणसं आहेत. त्यांना कितीही जागं करायचा प्रयत्न केला तरी ते जागे होते नाहीत. प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांवर आगपाखड करणे, हा त्यांच्या आयुष्याचा अजेंडा आहे. एक हिंदुत्ववादी संघटना आरएसएसचा स्वयंसेवक 2014 साली देशाचा पंतप्रधान झाला. 2019 ला परत सगळे विरोधक एकत्र आले. पण भाजपच्या सीट कमी व्हायच्या ऐवजी वाढत गेल्या. त्यामुळे यांचं पोट दुखतंय, त्यामुळे उठ सूठ सावरकरांवर टीका करतात, अशी खोचक टीका शरद पोंक्षे यांनी केली.
यांच्या आजीनेही कौतुक केलंय…
स्वतः महात्मा गांधींनी सावरकरांचं कौतुक केलंय. इंदिरा गांधी अर्थात राहुलची आज्जी त्यांनीही पंतप्रधान असताना सावरकरांचं पहिलं पोस्टाचं तिकिट छापलं होतं. सावरकरांच्या बलिदानाचं त्यांनी कौतुक केलं होतं. दादरला सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक आहे, त्यासाठी वैयक्तिक निधीतून देणगी दिली आहे. त्यामुळे मी सावरकर नाही, मी गांधी असं तो म्हणतोय तर तो गांधीजींशी स्वतःची तुलना करतोय. तर तो गांधींजीच्या नखाचीही सर त्याला येणार नाही, असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलंय.
राष्ट्राच्या उपयोगासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांना दयेचे अर्ज केले, यात काहीही चूक नाही. पण या बिनडोक लोकांना ते कळत नाही. सावरककर हा तळपणारा सूर्य आहे. एवढ्या काँग्रेसवाल्यांनी या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांची थुंकी त्यांच्याच तोंडावर आपटली आहे, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली.