आदित्य ठाकरे कडाडले, आमदार विकत घ्यायला पैसे आणि औषधे घ्यायला…
राज्यात काही शहरात औषध आणि मृत्यूची चर्चा झाली. मात्र, यावर राजकारण न करता मार्ग काढणे महत्वाचं आहे. याच यंत्रणेच्या कामाची कोव्हिड काळात स्तुती झाली. मात्र, काय आणि कुठे चुकलं याची माहिती...
नागपूर : 9 ऑक्टोबर 2023 | राज्यात मागणीच्या तुलनेत औषध पुरवठा होत नाही. हा बेसिक सपोर्ट शासनाने द्यायला पाहिजे. आरोग्यसेवेची अनेक पदे रिक्त आहेत. मुंबईतही स्टाफ, औषधांची कमतरता आहे. पावसामध्ये अनेक आजार बळावतात. बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्णसुद्धा येतात. आरोग्य सेवा आहे पण त्याला सरकारची मदत मिळाली पाहिजे. यामध्ये आरोग्य खाते कमी पडत आहे. आम्ही या विषयावर आंदोलन करू शकलो असतो. पण, आम्ही परिस्थिती जाणून घेत आहोत. आम्हाला आंदोलन करता आलं असत मात्र आम्ही मार्ग काढायला आलो, असे शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर मेडिकल कॉलेजला भेट दिली. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू होत असल्याची काही दिवसापासून चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठकारे यांनी मेडिकल कॉलेजला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मेडिकल प्रशासनासोबत चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले. ‘तीन वेगवेगळ्या शहरात आम्ही भेटी दिल्या. तिथली व्यवस्था बघितली. राज्यात काही शहरात औषध आणि मृत्यूची चर्चा झाली. मात्र, यावर राजकारण न करता मार्ग काढणे महत्वाचं आहे. याच यंत्रणेच्या कामाची कोव्हिड काळात स्तुती झाली. मात्र, काय आणि कुठे चुकलं याची माहिती घ्यायला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असे ते म्हणाले.
रुग्णालयात काय झालं त्याची चौकशी होणार आहे. मात्र, पुढे काय हे महत्त्वाचं आहे. डिनला जास्तीचे अधिकार देण्याची गरज आहे. त्यांना औषध खरेदीची परवानगी दिली पाहिजे. बाथरूम साफ करणे हे डिनचे काम नाही. पण, त्याठिकाणी इतर यंत्रणा काम करते की नाही त्यावर लक्ष ठेण्यासाठी जबाबदाऱ्या वाटून द्यायला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
औषध खरेदी ही वेळेत व्हायलाच पाहिजे. स्वच्छता करणे वाईट नाही पण डिनकडून हे करून घेणं योग्य नाही. आमदार विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहे मग औषध घ्यायला का नाही. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढणार. मात्र, डिनसारख्या एकाच व्यक्तीवर दबाव पडतो म्हणून पदांची भरती झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.