खरा मुख्यमंत्री कोण? गद्दार की गद्दारी करायला लावणारा? आदित्य ठाकरेंचा थेट फडणवीसांवर निशाणा? का भडकले?
आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, 'राजकारणातून ठाकरे परिवाराला भाजपला संपवायचं हे दिसायला लागलं आहे.
मुंबई : राज्यातला खरा मुख्यमंत्री कोण, गद्दार की गद्दारी करायला लावणारा, असा सणसणीत सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलाय. याद्वारे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बाबरी मशीद पाडण्याविषयी द्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. बाबरी मशिदीचा ढाचा पडला तेव्हा शिवसैनिक नव्हते, बाळासाहेब ठाकरे हेही अयोध्येत नव्हते. नंतर मी जबाबदारी घेतो असे म्हणाले, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं. यानंतर ठाकरे समर्थक आक्रमक झाले आहेत.
‘भाजपचा ठाकरे परिवारावर राग’
आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, ‘राजकारणातून ठाकरे परिवाराला भाजपला संपवायचं हे दिसायला लागलं आहे. भाजपाचा राग हा बाळासाहेब ठाकरें, ठाकरे परिवारावर आहे. बाळासाहेब ठाकरेंमुळे भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली. आता तर गद्दारांकडून कोणतीच अपेक्षा नाही हे असेच झुकलेले राहतील, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री फक्त फोटो काढतात…
अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. मात्र मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फोटो काढायला जातात . आतापर्यंत ज्या घोषणा झाल्या त्यापैकी किती मदत मिळाली, हे एकदा जाणून घ्या, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलंय. या टोळीला महाराष्ट्राला बदनाम करायचंय. पाकिस्तानसारखी अवस्था यांना करायची आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या…
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदे घेत शिंदे आणि भाजपवर संताप व्यक्त केलाय. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान हे कसे सहन करू शकतात? मुख्यमंत्र्यांनी आधी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा स्वतः राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर चंद्रकांत पाटील यांनी लगोलग पत्रकार परिषद घेतली. ठाकरे परिवाराचा काही गैरसमज झाला असेल तर तो मी दूर करेन, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. बाबरीचा ढाचा पाडायला गेलेल्यांमध्ये सगळेच हिंदु होते. विश्वहिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या बॅनरखाली सगळे एकत्र होते. त्यात शिवसैनिकही होते, असं चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलंय. मुंबईतील दंगलींमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि एकूणच त्यांची कारकीर्द माझ्यासाठी श्रद्धास्थानी आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलंय.