ADR चा धक्कादायक अहवाल : लोकशाहीच्या मंदिरात तब्बल इतक्या नवनिर्वाचित खासदारांवर गंभीर गुन्हे, बलात्कार, खुनाचा प्रयत्न…
नवनिर्वाचित खासदारांची सरासरी संपत्ती 46 कोटी रुपये आहे, तर 93 टक्के खासदार करोडपती आहेत अशी ADR ची आकडेवारी आहे. तर गंभीर गुन्हे असलेल्या विजयी खासदाराचे प्रमाण 170 ( 31 टक्के ) आहे. जिंकलेल्या खासदारात गंभीर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या खासदाराचे प्रमाणही मोठे आहे.
18 लोकसभेसाठी मतदान होऊन 4 जून रोजी खासदारांनी विजय मिळविला आहे. यंदा 543 खासदार निवडून आले आहेत. या 543 खासदारांपैकी 46 टक्के खासदारांवर ( 251 ) गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 27 गुन्ह्यात त्यांना दोषी ठरविण्यात आले असल्याची आकडेवारी पोल राईट्स बॉडी एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म ( ADR ) या संस्थेने जारी केली आहे. नवनिर्वाचित खासदारांची सरासरी संपत्ती 46 कोटी रुपये असून 93 टक्के खासदार करोडपती आहेत. खालच्या सभागृहात निवडून आलेल्या 251 खासदारांवर गुन्हे दाखल दाखल असण्याचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
एकूण 543 खासदारांपैकी 233 खासदारांनी ( 43 टक्के ) त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहीती निवडणूकीच्या शपथपत्रात दिली आहे. साल 2014 मध्ये 185 ( 34 टक्के ), साल 2009 मध्ये 162 ( 30 टक्के ), आणि साल 2004 मध्ये 125 ( 23 टक्के ) खासदारांनी त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची माहीती आपल्या निवडणूकीच्या शपथपत्रात नोंदविली होती. साल 2009 नंतर त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहीती देण्याच्या खासदारांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाली आहे. यंदा जिंकलेल्या खासदारांपैकी 170 ( 31 टक्के ) खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात बलात्कार, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांचा समावेश आहे.
खासदारांनी त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची माहीती शपथपत्रात जाहीर करण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत चालली आहे. साल 2019 मध्ये 159 ( 29 टक्के ), साल 2014 मध्ये 112 ( 21 टक्के ) आणि साल 2009 मध्ये 76 ( 14 टक्के ) असे प्रमाण आहे. साल 2009 नंतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खासदारांचे प्रमाणे 124 टक्के वाढले आहे. 27 विजयी खासदारांनी ते गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरल्याचे जाहीर केले आहे, त्यात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 302 अंतर्गत खुनाशी संबंधित चार प्रकरणे आणि IPC च्या कलम 307 अंतर्गत खुनाच्या प्रयत्नांची 27 प्रकरणे आहेत.
स्वच्छ उमेदवारांची जिंकण्याची शक्यता कमी !
15 विजयी खासदारांनी महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित केसेस निवडणूक आयोगासमोरील शपथपत्रात नमूद केल्या आहेत, ज्यात दोन जणांवर IPC कलम 376 अंतर्गत बलात्काराच्या आरोपांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, चार विजयी खासदारांनी अपहरणाशी संबंधित प्रकरणे शपथपत्राद्वारे जाहीर केली आहेत आणि 43 जणांनी द्वेषपूर्ण भाषणाशी संबंधित प्रकरणे जाहीर केली आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गुन्हेगारी खटले घोषीत केलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता 15.3 टक्के होती, तर स्वच्छ पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी हे प्रमाण केवळ 4.4 टक्के होते, असेही धक्कादायक सत्य एडीआरने केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे.
भाजपाच्या 94 खासदारांवर फौजदार गुन्हे
18 व्या लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या 240 खासदारांपैकी 94 ( 39 टक्के ) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या 99 विजयी खासदारांपैकी एकोणचाळीस ( 49 टक्के) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि समाजवादी पक्षाच्या 37 खासदारांपैकी 21 (45 टक्के) खासदरांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. टीएमसीच्या 29 पैकी 13 ( 45 टक्के ), द्रमुकच्या 22 पैकी 13 ( 59 टक्के ), टीडीपीच्या 16 पैकी आठ ( 50 टक्के ) आणि शिवसेनेच्या सात विजयी उमेदवारांपैकी पाच ( 71 टक्के ) खासदारांनी त्यांच्यावरील गुन्हे शपथपत्राद्वारे जाहीर केले आहेत. 63 (26 टक्के) भाजप उमेदवार, 32 (32 टक्के) काँग्रेस उमेदवार आणि 17 (46 टक्के) सपा खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे एडीआरने केलेल्या विश्लेषणात आढळून आले आहे.टीएमसीचे सात ( 24 टक्के), डीएमकेचे सहा ( 27 टक्के ), टीडीपीचे पाच ( 31 टक्के ) आणि शिवसेनेच्या चार ( 57 टक्के) खासदारांवर गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.