मुंबई, दि.22 डिसेंबर | देशभरात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट JN.1 मिळाल्यानंतर देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात केरळमध्ये ३०० रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. देशात कोरोना रुग्णाची संख्या 2,669 झाली आहे. कोरोनाचे रुग्ण छत्रपती संभाजीनगरात आढळले आहे. यामुळे कोरोनाचा धोका आता कोकणापासून मराठवाड्यापर्यंत पोहचला आहे. नवीन व्हेरिंयंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. दरम्यान, मुंबईत मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आणि त्यातही जे-१ या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण कोकणात आढळल्याने पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. खबरदारी म्हणून मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी मास्कची सक्ती मात्र नाही, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी नगर शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. ६६ नमुन्यांपैकी दोन रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. संभाजीनगर शहरात दोन कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेला प्रशासन चालना देणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश शिंदे यांनी बैठकीत दिले.
राज्यात आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करावी. त्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स याबाबत माहिती घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.