राजकीय घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी लेखाजोखाच मांडला, शिंदे आणि फडणवीस यांच्यावर केली अशी टीका
राज्याच्या राजकारणात सलग दुसऱ्या वर्षी राजकीय भूकंप अनुभवायला मिळाला आहे. एक वर्षापूर्वी शिवसेनेच उभी फूट पडली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेच घडलं. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई : राज्याचं राजकारणात कधी काही घडेल हे सांगता येत नाही असंच म्हणावं लागेल. चित्रपटात घडाव्या तशा घटना काही महिन्यांनी घडत आहेत. त्यामुळे कोण कोणासोबत सरकार स्थापन करेल सांगता येत नाही. एक वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षच आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाची चांगलीच गोची झाली आहे. अशीच काहीशी स्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना दिसत आहे. अजित पवार यांनी काही मोजक्या आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. असं काही घडामोड होईल अशी कल्पना नसताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आपल्या राज्यात सध्या सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाच्या खोलात न जाता, लक्षात घेण्यासारखे काही महत्त्वाचे मुद्दे या मथल्याखाली आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी काय मुद्दे मांडले आहेत पाहुयात
- मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना 1 वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
- रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
- एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “145 जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
- आणि सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं?? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
- एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे!
- ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे!
राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात बऱ्याच घडामोडी घडणार असल्याचं दिसत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या घडामोडीमुळे काय फरक पडतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.