निलेश लंके यांची तब्येत बिघडताच दुसऱ्याच दिवशी अजित पवार उपोषणस्थळी, आणि थेट नितीन गडकरी यांना फोन, काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अखेर चौथ्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार निलेश लंके हे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी निलेश लंके उपोषणाला बसले होते. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ते उपोषणाला बसले होते. विशेष म्हणजे या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंके यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. अखेर त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार आज उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला. यावेळी नितीन गडकरी यांनी रस्ते दुरुस्तीचं आश्वासन दिलं. त्यानंतर अजित पवार यांनी निलेश लंके यांची समजूत काढली. अजित पवारांनी समजवल्यानंतर निलेश लंके यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण स्थगित केलं.
अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदनगर -पाथर्डी, अहमदनगर- शिर्डी आणि अहमदनगर-टेंभुर्णी या तीनही राष्ट्रीय महामार्गांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झालीय. आतापर्यंत अनेकदा आंदोलन झाली. या तिन्ही राष्ट्रीय मार्गावर आत्तापर्यंत अपघातात अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. आणि याचमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी गेल्या तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाला महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
निलेश लंके यांनी आज उपोषण मागे घेतल्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार तसेच भाजपवर निशाणा साधला. तसेच नितीन गडकरी यांनी आश्वासन दिल्यामुळे निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
“नितीन गडकरी यांनी शब्द दिलाय. वेळेत काम पूर्ण केलं जाईल, असं आश्वासन दिलंय. यासाठी निलेश आणि मी पाठपुरावा करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच कोरोना काळात सुद्धा जीव धोक्यात घालून निलेश लंके यांनी मोठं काम केलंय”, असंदेखील अजित पवार म्हणाले.
“सरकार आल्यापासून अनेकजण वाचाळवीर झाले आहेत. राज्याच्या राज्यपालांपासून सगळे सत्ताधारी काहीही बोलत आहेत. महाराष्ट्राचे मंत्री हे काम करण्यासाठी मंत्री झाले की अशी वक्तव्य करण्यासाठी?”, असा सवाल करत अजित पवारांनी भाजप नेते प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. तसेच 17 तारखेच्या मोर्चात या सगळ्यांना उत्तर देऊ, असंही ते यावेळी म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही टीका केली. “लोकशाही मानणारे तुम्ही सगळे लोक. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच अशी वक्तव्य करणार असेल तर प्रश्न सोडवणार कोण? ज्या कर्नाटकात आपल्यावर अन्याय होतो त्याच कर्नाटक बँकेला मदत देण्याचे काम या सरकारने केले. आरेला कारे करण्याची गरज असताना ही कामाची पद्धत कोणती?”, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
“मुख्यमंत्री एकनाथरावांना कोणी अडवलं होतं सुटका करायला? ते तर सुरतहुन गुवाहाटी आणि तिथून गोवा गेले. काही वक्तव्य सध्या करण्याची स्पर्धा सध्या सुरूय. अशी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आता आवरलं पाहिजे”, असं मत अजित पवारांनी यावेळी मांडलं.