Maratha Reservation | “मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?” अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा सुरुवातीपासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला विरोध राहिला आहे. “मराठा समाजातील विनोद पाटील यांच्यासारखी विद्वान माणस बोलली असती, तर मी समजू शकतो. पण मनोज जरांगे पाटील काय बोलतात, यावर पत्रकारांना टीआरपी मिळू शकतो” अशा शब्दात गुणरत्ने सदावर्ते यांनी हल्लाबोल केला.
“ओपन, ओबीसी, भावांच्या जागा मी कमी होऊ देणाकर नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. कुणासोबत गैर होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. चुलत भावाला प्रमाणपत्र हवं असेल, तर प्रतिज्ञापत्र देण्याची कायद्यात तरतूद आहे. उच्च न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर जे प्रतिबंध घातलेत ते पाळावे लागतात, कोण कितीही मोठा असला तरी? जरांगे पाटलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन केलय” असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.
ऐका हो ऐका….
“ऐका हो ऐका, जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलय, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत, त्यांच्या बाबतीत आरक्षणाचा विचार करणं किती योग्य आणि किती अयोग्य” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जो अध्यादेश काढलाय, त्याला न्यायालयात आव्हान देणार का? या प्रश्नावर गुणरत्ने सदावर्ते यांनी “अहो, सोमवारची वाट बघा, लोकांना आपपाल्या घरी जाऊ द्या, सोमवारची वाट बघा” असं उत्तर दिलं.