मुंबई | 23 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसाची मुदत मंगळवारी 24 ऑक्टोंबरला संपत आहे. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सभा घेतली. या सभेत २५ तारखेपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. तसेच कोणत्याही आमदार, नेते, मंत्री यांनी चर्चेला येऊन नये असेही बजावले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेते, आमदार, मंत्री यांना गावबंदी करा असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनानंतर राज्यात एकच आगडोंब उसळलाय. अनेक जिल्ह्यातील गावांनी नेते, मंत्री यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री संजय बनसोडे यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला.
सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेय. लातुर जिल्ह्यात वाढवना इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा कार्यकर्त्यानी अडवून जाब विचारला. मराठा आरक्षणासाठी तुम्ही आणि सरकार काय करत आहात? असा थेट सवाल करत कार्यकर्त्यानी आरक्षण मिळेपर्यंत उदगीर मतदार संघातल्या कोणत्याही गावात येऊ देणार नाही असा इशारा मंत्री संजय बनसोडे यांना दिला.
मुक्ताईनगर : मुक्ताईनगरच्या सारोळा येथे मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढार्यांना गावबंदी करण्यात आलीय. सारोळा गावात सकल मराठा समाजाने रास्ता रोको करून रोष व्यक्त केला. तसेच आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याच पुढार्याला प्रवेश करू देणार नसल्याचेही जाहीर केलेय.
सांगली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही या मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनाला सांगली जिल्ह्यातूनही प्रतिसाद मिळालाय. खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव ठरलेय.
सातारा : जिल्ह्यातील फलटण, सातारा, कराड, खटाव तालुक्यातल्या गावांमध्ये नेते, पुढारी, मंत्री यांना गावबंदी असे बॅनर, फलक झळकु लागले आहेत. वडूथ गावानंतर आरफळ, आसू, खुबी, खोडशी, निमसोड या गावांमध्ये फलक लागले आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जनतेला आवाहन करताना कायमस्वरूपी मराठा आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. पालकमंत्री म्हणून मी ही शब्द देतो. मात्र, असे गाव बंदीचे निर्णय नागरिकांनी घेऊ नये असे आवाहन केलंय.
धुळे : धुळ्यातील गावांमध्येही गावबंदीचे फलक लागले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे युवा अध्यक्ष निलेश काटे यांनी 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नाही तर शहरात देखील मंत्र्यांना शहर बंदी करण्यात येईल असा इशारा दिलाय.
पंढरपुर : पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावात राजकीय, सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचे फलक लागलेत. सकल मराठा समाजाच्या बैठकीत खेडभोसे गावातील गावकऱ्यांनी नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला. ‘चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष’, अशा आशयाचे बोर्ड खेडबोसे गावात लागले आहेत. कराड तालुक्यातील खोडशी तसेच नाशिक जिल्ह्यातील कातरणी आणि देवर गावात नेते मंत्री यांना बंदी घालण्यात आलीय.