आता धनगर समाज आक्रमक, 12 दिवसापासून उपोषण सुरु, आंदोलकांची तब्येत खालावली
चोंडी येथे सुरु असलेल्या आंदोलनातील काही आंदोलकांची तब्येत खालावली आहे. उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. तर, सुरेश शिवाजीराव बंडगर यांना उपोषण स्थळी सलाईन लावण्यात आलंय. त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
अहमदनगर : 17 सप्टेंबर 2023 | जालना येथील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं. मराठा समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. स्वहस्ते सरबत देऊन त्यांचे उपोषण संपवले. मराठा समाजाच्या आंदोलनाचे राज्यात घोंगावणारे हे वादळ शमते न शमते तोच आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यशवंत सेनेने एल्गार पुकारला आहे.
अहमदनगरच्या चोंडी गावात यशवंत सेनेने धनगर समाजाला धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडताळे यांच्या नेतृत्वाखाली मागील 12 दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपोषणकर्त्यांचे बोलणं करून दिलं. यावेळी बाळासाहेब दोडताळे यांनी धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं यासाठी तत्काळ एक बैठक लावावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी चौंडी येथे धनगर समाजाच्या या आंदोलनस्थळी भेट दिली. सानप यांनी भगवान महासंघाच्यावतीने या आंदोलनाला पाठींबा दिला. सरकारने या आंदोलनाचा दुर्लक्ष केल्याचा आरोप सानप यांनी केला. तसेच सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागेल असा इशाराही दिला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही सानप यांनी केली आहे.
भाजप आमदार राम शिंदे यांनीही चौंडी येथील उपोषण स्थळावर भेट देत उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारमध्ये आमदार राम शिंदे यांचे वजन कमी पडत असल्याची टीका केली होती. त्यावरून आमचं वजन जिथे दाखवायचं तिथे दाखवू असा टोला लगावत राम शिंदे यांनी उत्तर दिले. राजकारण करण्याचे हे स्थळ नाही. सरकार आरक्षण देण्यासंदर्भात कटिबद्ध आहे, असेही राम शिंदे यांनी यावेळी म्हटलं.