रायगड : राज्यात सध्या मराठा समाजाच सर्वेक्षण सुरु आहे, काही संतापजनक बाबी समोर आल्या आहेत, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारला, त्यावर त्यांनी “मराठा समाज मागास आहे, हे सरकारने सिद्ध कराव. ती सरकारची जबाबदारी आहे” असं उत्तर दिलं. मनोज जरांगे पाटील आज रागयडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन घेणार आहेत. रायगडावर आल्यानंतर विजय प्राप्त होतो, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. “कधी नव्हे, तो 70 वर्षात आता मराठ्यांसाठी कायदा बनलाय. मराठ्यांना आरक्षण मिळेलच, पण त्या सोबत सग्यासोयऱ्यानाही आरक्षणाचा लाभ मिळेल. एकही मराठा ओबीसीत जाण्यापासून वंचित राहणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठ्यांचा विजय झालाय पण नव्या कायद्यानुसार पहिल प्रमाणपत्र मिळालं की, महादिवाळी साजरी करु, गुलाल उधळू” असं जरांगे पाटील म्हणाले.
‘थोड वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. थोड इंग्लिश आणि हिंदी शिकतोय’ हिंदी शिकण्याची गरज काय? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अनेक कारण आहेत. “शेतकरी आणि मराठ्यांच्या जीवनात परिवर्तन आणायच आहे. लांब नाव चालवताना पोहण्यासाठी स्वत: परिपूर्ण असलं पाहिजे. लांब पल्ल्याची लढाई आहे, भविष्यात काहीही होऊ शकत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आणखी दोन समाजांसाठी आरक्षणाचा लढा लढण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
‘कर म्हणा तुला काय करायच ते, सरकार कुठे भीतय त्याला’
“मराठ्यांना आरक्षण मिळाली की, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठ्यांच्या आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे. ते झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिमांना सरकार आरक्षण कस देत नाही तेच बघतो?” असं जरांगे पाटील म्हणाले. ओबीसीसाठी काही करता आले नाही, तर मंत्रिमंडळातून राजीनामा देणार, असं छगन भुजबळ म्हणतायत. “आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. आता देऊन काय उपयोग?. कर म्हणा तुला काय करायच ते, सरकार कुठे भीतय त्याला” असं जरांगे पाटील म्हणाले.
‘त्याचवेळी सगळ्या गोष्टी तिथे सोडून आलो’
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणाच्या बाजूचे नाहीत. ते सत्याच्या बाजूने उभे राहणार. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे सहाजिकच त्यांना साथ द्यावी लागेल. माझ कोणाबरोबरही राजकीय वैर नाही. मी मुंबईवरुन परत आलो, त्याचवेळी सगळ्या गोष्टी तिथे सोडून आलो. जातीसाठी भांडण, संघर्ष आवश्यक होता, म्हणून केला. यापुढे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणी काही बोललं, तर त्याला मात्र उत्तर देणार” हे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.