मुंबई, ठाणे नंतर आता पुणे जिल्हा विभाजनाच्या वाटेवर? कोणी केली मागणी? नव्या जिल्ह्याचे नाव काय?
ठाणे जिल्ह्याचेही ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे करण्यात आले. मग, पुणे जिल्ह्याचे दोन जिल्हे का नाही ? असा प्रश्न भाजप आमदारांनी उपस्थित केलाय. लोकसंख्येच्या आधारावर पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे अशी मागणी आमदारांनी केली.
पुणे : मुंबईचे शहर आणि उपनगर असे दोन जिल्हे करण्यात आले. ठाणे जिल्ह्याचेही ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे करण्यात आले. मग, पुणे जिल्ह्याचे दोन जिल्हे का नाही ? असा प्रश्न भाजप आमदारांनी उपस्थित केलाय. लोकसंख्येच्या आधारावर पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे अशी मागणी आमदारांनी केली. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसं पत्रही लिहिलं आहे. शिवाय आज पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच ही मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे आता पुणे जिल्हाही विभाजनाच्या वाटेवर असल्याचे बोललं जातंय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना आमदार महेश लांडगे यांनी ही मागणी केली.
पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावांचा समावेश केला. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा अशी पुण्याची ओळख निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ठाणे ओळखला जात होता. पण, लोकसंख्येचा आधारे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे आता ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे निर्माण झाल्यामुळे ही लोकसंख्या विभागली गेली.
महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येमध्ये पुण्याचा पहिला, ठाण्याचा दुसरा तर मुंबई उपनगरचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे मुंबई आणि ठाणेप्रमाणेच पुण्याचेही विभाजन करा अशी मागणी त्यांनी केली.
नव्या जिल्ह्याला ‘शिवनेरी’ नाव
पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्याला शिवनेरी असे नाव द्या. त्याचा सर्वात जास्त अभिमान वाटेल असे आमदार लांडगे म्हणाले. नव्या शिवनेरी जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, देहू आळंदी, शिक्रापूर यांच्यासह जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ या तालुक्यांचा समावेश करा. तर पुणे जिल्ह्यात हवेली, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, पुणे शहर यांचा समावेश असावा असे त्यांनी सांगितलं.