काँग्रेसमध्येही धमाका, अजित पवार यांच्या बंडाचा काँगेसने घेतला धसका, विरोधी पक्षनेते पद कुणाकडे?
राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी होऊन सर्वाधिक जास्त संख्याबळ काँग्रेसचे असेल. त्यामुळे विरोधी पक्ष नेते काँग्रेस आपला दावा सांगू शकेल. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर कॉंग्रेस नेते सावध झाले आहेत.
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली. अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेते या पदावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी नियुक्ती केली आहे. मात्र, अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या या बंडाचा धसका काँग्रेसने घेतलाय. तर, काँग्रेसमध्येदेखील प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करणारे अनेक नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तेही आज ना उद्या उघडपणे येतील असा दावा एका नेत्याने केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन उभे गट पडले आहेत. अजित पवार गट सत्तेत सामील झाला आहे तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात बसणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या सभागृहात कोणता गट अधिकृत याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे सुमारे 27 आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत.
विधानसभा अध्यक्षांनी जर अजित पवार यांचा गट अधिकृत ठरविल्यास शरद पवार यांनी नियुक्त केलेले जितेंद्र आव्हाड यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येईल. शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी होऊन सर्वाधिक जास्त संख्याबळ काँग्रेसचे असेल. त्यामुळे विरोधी पक्ष नेते काँग्रेस आपला दावा सांगू शकेल.
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर कॉंग्रेस नेते सावध झाले आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता विधान भवनात पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करणारे अनेक नेते आहेत. ते ही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तेही आज ना उद्या उघडपणे येतील असे ते म्हणालेत.
चले जावचा नारा द्यायचा
अजित पवार यांनी केवळ निर्णय घेतला नाही तर संपूर्ण पक्षच भाजपच्या बाजूने उभा केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांना उघडपणे भाजपसोबत जाऊन राजकारण करायचे आहे की लपून करायचे आहे हे ही दिसून येईल. पण, आता महाराष्ट्राच्या जनतेने सावध व्हायला हवं, संविधानाची मूल्य तुडवणारे पक्ष आपल्याला सरकारमध्ये आणायचे आहे की 2024 मध्ये यांना चले जावचा नारा द्यायचा हे ठरविण्याची वेळ आली आहे असेही फारूक अहमद म्हणाले.
जेलमध्ये जायचं की सत्तेमध्ये यायचं हा पर्याय
या पक्षाच्या नेत्यांमध्ये नैतिक आणि चरित्र राहिलेले नाही. भ्रष्टाचारमध्ये गुंतलेले नेत्यांच्या हातात पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे ईडीची बंदूक यांच्या कनपटीवर ठेवलेली आहे. जेलमध्ये जायचं की सत्तेमध्ये यायचं हा पर्याय त्यांना दिलेला आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत. अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. 16 आमदारांचे निलंबन झाल्यानंतर सरकार अल्पमतात येईल याची पूर्वकल्पना येताच हा खेळलेला डाव असण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.