फटाक्यांची आतषबाजी अन साहेब, साहेब, नारे… पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकार्यकर्त्यांचा जल्लोष
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
मुंबई : राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावण्यात आला आहे. तसेच शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला. प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधत हे निवेदन सादर केलं. निवड समितीच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. NCPच्या कार्यालयाबाहेर आनंदाचं वातावरण पहायला मिळत असून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा सर्वांनाच अनपेक्षित होती. तेव्हापासून राज्यभरात या निर्णयाचे पडसाद उमटत होते. राज्यात विविध ठिकाणी या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली जात होती, पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी बॅनर्सही लावण्यात आले होते.
गेल्या तीन दिवसांपासून एनसीपीच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्ते जमले होते व पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे अशी मागणी करत होते. आज सकाळी ११ राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक सुरू होताच प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद पवार हेच तहह्यात राष्ट्रीय अध्यक्ष ठेवण्याचा ठराव मांडण्यात आला. शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधत फक्त तीन ओळीचं निवेदन सादर केलं. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष, महिलांनी घातली फुगडी
प्रफुल पटेल यांच्या निवेदनानंतर शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला एकच उधाण आले. एनसीपी कार्यालयाबाहेर साहेब, साहेब, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिला कार्यकर्त्यांनी फुगडी घालत त्यांचा आनंद व्यक्त केला तर काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पवार साहेब हेच ज्येष्ठ असून आम्हाला कायम त्यांचा आशिर्वाद हवा आहे, त्यांनी अध्यक्षपदी कायम रहावे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.