मोठी बातमी! श्रीनिवास वनगा यांच्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा आणखी एक बडा नेता नॉट रिचेबल
शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा यांच्यानंतर आता पक्षाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल झाला आहे. यामुळे विधानसभेपूर्वी शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा यांच्यानंतर पालघर जिल्ह्यातील पक्षाचा आणखी एक नेता मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आदिवासी राज्य संघटक आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत .
जगदीश धोडी यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्याविरोधात बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या राज्यात बंड क्षमवण्यासाठी महायुतीकडून बंडखोरांना फोन द्वारे संपर्क केला जात आहे . मात्र याचवेळी बंडखोर जगदीश धोडी तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे .
पालघर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाने दोन्ही ठिकाणी भाजपमधून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली. ऐनवेळी शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना संधी मिळाल्यानं पालघरमधील स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेना नेते श्रीनिवाल वनगा यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले होते. आता जगदीश धोडी हे नॉट रिचेबल आहेत. आयात उमेदवारांना संधी मिळत असल्यानं कार्यकर्त्यांच्या मनात खदखद असल्याची प्रतिक्रिया धोडी यांनी नॉट रिचेबल होण्यापूर्वी दिली होती.
बंडखोरीमुळे महायुतीचं टेन्शन वाढणार?
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या चार डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मात्र यावेळी महायुतीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात नाराज इच्छुकांनी बंडखोरी केल्याचं चित्र आहे. या बंडखोरीचा फटका हा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. त्यामुळे आता त्या -त्या मतदारसंघातील पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांकडून बंडखोरांशी बोलणी सुरू आहेत. शेवटच्या दिवसापर्यंतर सर्व बंडखोर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसण्याची शक्यता आहे.