‘शिवराजसिंह यांना फेकलं, योगीजी सांभाळा’, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, 400 पार काय 400 मतांच्या…
रामाच्या नावावर मत मागणार, हनुमानाच्या नावावर मतं मागणार. आता देशाला काय देणार घंटा? राम भरोसे काय झालं. काम भरोसे मतं मागा. यांच्याकडे काही पर्यायच नाही.

नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात निवडणूक जिंकून दिली. मध्यंतरी बातमी आली की चौहान यांच्या घरावर लिहिलंय ‘मामा का घर’. म्हणजे त्यांना मामा बनवलं. देवेंद्र यांना फेकलं. उद्या मिंध्यांना फेकतील. शिवराज यांना फेकलं. वसुंधरा राजेंना फेकलं. छत्तीसगडमध्ये आणखी कुणाला फेकलं. किती ही नीच लोकं आहेत. वापर करून फेकत आहेत. मला भीती वाटते योगी जी आपण संभालो! तुम्हाला सल्ला देत नाही. माझा सल्ला मानण्याची गरजही नाही. जे प्रतिस्पर्धी होऊ शकतात त्यांना भाजप संपवत आलं आहे. त्यामुळे योगीजी पद सांभाळा. उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार निवडून येतात. खासदार आले की असं काही करतील की योगींनाही बाजूला करतील असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
मधल्या काळात भाजपवालेच लोक बोंबलून ओरडत होती बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट बॉलिवूड. काल कोण होतं? बॉलिवूडच होते. शंकराचार्य नव्हते तिथे. हे यांचं थोतांड आहे. रामाच्या नावावर मत मागणार, हनुमानाच्या नावावर मतं मागणार. आता देशाला काय देणार घंटा? राम भरोसे काय झालं. काम भरोसे मतं मागा. यांच्याकडे काही पर्यायच नाही अशी टीकाही त्यांनी केली.
आमच्या आघाडीत अनेक चेहरे पर्याय म्हणून आहेत. अब की बार 400 पार म्हणत आहात. पण, ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. 400 पार काय 400 मतांच्या आत आटोपता की नाही पाहा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘जय भवानी, जय महाराष्ट्र’चा नारा राज्याच्या कानाकोपऱ्यात असा घुमवा की दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले पाहिजे असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.
आता फिल्मफेअरचा सोहळा ते गुजरातला घेऊन जात आहे. महसूल मिळण्याची ठिकाणं गुजरातला नेत आहे. महाराष्ट्राने असं काय पाप केलंय की आमच्या मुळावर येत आहात. महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालत आहे? मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडला हे सांगा. तुम्ही सांगा. जसं मुख्यमंत्रीपद सोडलं. तसं मी जे पद आहे ते सोडायला तयार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राम एकवचनी होते. सत्यवचनी होते. मी आईवडिलांची शपथ घेऊन सांगितलं, अमित शाह यांनी वचन मोडलं. नाही पाळलं त्यांनी. वचन मोडूनही तुम्ही स्वतःला रामभक्त समजता. वचन मोडलं नसतं तर आज फडणवीस अर्धा नव्हे पाव मुख्यमंत्री झालेत ते अडीच वर्ष पूर्ण मुख्यमंत्री झाले असते असेही ते म्हणाले.