FIR मध्ये पहिलं आणि दुसरं नाव कुणाचं टाकणार?; काळं फासल्यानंतर नामदेव जाधव यांची पहिलीच प्रतिक्रिया
नामदेव जाधव यांच्या पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही या ठिकाणी येणार असल्याचं कळल्यानंतर राष्ट्रवादीने या ठिकाणी जोरदार आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीकडून जाधव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतरही जाधव यांनी या ठिकाणी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं.
पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : अभ्यासक आणि प्राध्यापक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यावरून नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीवरच हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा खून केला आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांची नावे आपण एफआयआरमध्ये लिहिणार असल्याचं नामदेव जाधव यांनी म्हटलं आहे.
हल्ला झाल्यानंतर नामदेव जाधव यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली. तसेच या हल्ल्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचा निषेध नोंदवला. पुण्यात मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असताना माझ्यावर हल्ला झाला. मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचे कागदपत्र माझी हाती लागले होते. ते वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ते पटलं नाही. त्यामुळेच माझ्यावर हल्ला करण्यात आला, असं नामदेव जाधव यांनी सांगितलं.
त्यांनी कार्यक्रम उधलून लावला
मराठा आरक्षणाची वास्तव माहिती देण्याचा माझा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. त्यानंतर पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी असं समजतो की शीव, फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या गुंडांनी हा हल्ला केला आहे. त्यांनी एकप्रकारे शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा खून केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नये म्हणून त्यांनी केलेला हा हल्ला आहे, अशी टीका जाधव यांनी केली.
दोषींवर कारवाई करा
माझ्या संरक्षणासाठी पोलीस होते. कांबळे नावाचा पोलीस होता. त्याने माझं संरक्षण केलं. त्याच्या जीवालाही धोका होता. माझ्याही जीवाला धोका होता. हा लोकशाहीवरील हल्ला आहे. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. लोकशाहीवरील हा हल्ला आहे. पोलिसांवरील हल्ला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करणारा हा हल्ला आहे. जेवढे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
खासदारकी, आमदारकी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार
हा हल्ला फक्त माझ्यावरचा नाही तर पाच कोटी मराठ्यांवरचा हा हल्ला आहे, असं मी समजतो. मी सीपी ऑफिसला जात आहे. कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. मी कार्यकर्त्यांना या हल्ल्याला जबाबदार धरणार नाही. एफआयआरमध्ये पहिलं नाव शरद पवार यांचं असणार आहे. दुसरं नाव रोहित पवार यांचं असणार आहे. या दोघांची आमदारकी आणि खासदारकी रद्द करण्यासाठी मी प्रचंड मोठं आंदोलन करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.