शिंदे गटानंतर शरद पवार यांची आता भाजपवर मात, माजी मंत्र्याने केला पक्ष प्रवेश
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपलाही धक्का दिलाय. भाजपचे बडे नेते आणि माजी सहकार मंत्री यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलाय. हा भाजप आणि अजितदादा गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई | 29 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा आपला करिश्मा दाखविण्यास सुरवात केलीय. शरद पवार यांच्या गटातील 8 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कालच अपात्रतेची नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, त्याला शरद पवार गटाने फार गांभीर्याने घेतले नाही असे दिसतंय. शरद पवार यांनी शिंदे गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पक्षात प्रवेश देत एकनाथ शिंदे यांना शह दिला. त्यापाठोपाठ एका माजी मंत्र्याला राष्ट्रवादीत प्रवेश देत भाजपलाही धक्का दिलाय. या माजी मंत्र्यांला पक्षप्रवेश दिल्यामुळे भाजप आणि अजितदादा गटाचीही शरद पवार यांनी मोठी कोंडी केलीय.
लातुर जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या मतदारसंघाचे विनायक पाटील यांनी प्रतिनिधित्व केले होते. विनायक पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द कॉंग्रेसमधून केली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार मंत्री होते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत अहमदपूर हा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. त्यामुळे विनायक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना भाजपचे निष्ठावंत नेते दिलीपराव देशमुख यांच्या रोषाचा सामना करावा लागला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. पण, दिलीपराव देशमुख यांनी बंड पुकारले आणि विनायक पाटील यांना आव्हान दिले.
दिलीपराव देशमुख यांच्या बंडामुळे विनायक पाटील यांचा पराभव झाला. तर, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील येथून निवडून आले. परंतु, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आणि बासाहेब पाटील यांनी अजित दादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीतहा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील राजकीय भवितव्यासाठी विनायक पाटील यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. यासोबतच भाजपमध्ये असलेली पक्षांतर्गत नाराजी हे ही त्यांच्या पक्ष प्रवेशाचे प्रमुख कारण मानले जाते.
2019 ला आपणाला उमेदवारी देऊन आपल्या पराभव भाजपच्याच मंडळीने केला असा आरोप माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केला. तर, दुसरीकडे विनायक पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाचे जिल्ह्यात पारडे जड झाले आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरविण्याची तयारी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.