वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? संभाजीराजे छत्रपती यांची फडणवीसांकडे मोठी मागणी
वाल्मिकी कराड याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिकी कराड याच्यावर आरोप करण्यात येत होते. त्याच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. अखेर घटनेच्या 22 व्या दिवशी वाल्मिकी कराड याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. तो पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिकी कराड शरण आल्यानंतरही विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरूच आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला, हे सीआयडीचं यश नसून, आम्ही सरकारवर जो दबाव टाकला त्यातून वाल्मिकी कराडवर मानसिक दबाव आला आणि तो शरण आला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 22 दिवस वाल्मिकी कराड हा महाराष्ट्रात बिनधास्तपणे फिरत होता. त्याने अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतलं. तो पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाला. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मिकी कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
वाल्मिकी कराड हा 7 आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने १४ गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा तो बॉडीगार्ड घेऊन फिरतो. कराडवर मोक्का लागणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी आता वाल्मिकी कराड याच्यावर मोक्का लावणार की नाही याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.वाल्मिकी कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद देऊ नये. कुणीही पालकमंत्री पद घ्याव पण देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये, मुख्यमंत्र्यानी पालकमंत्री पद स्वीकारलं तर आम्ही स्वागतच करू, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही आणि देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही , मोठ मन करून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मगाणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदा ही का बोलला नाहीत? असंही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.