शिंदे गट नाशिकच्या श्री काळारामाचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना !
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव आणि नाशिक शहरातून शिंदे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने जात असून त्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक : आज शिवसेनेचे (Shivsena) दोन ठिकाणी दसरा मेळावे होणार आहे. एक एकनाथ शिंदे गटाचा (Shinde Group) आणि एक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा होत आहे. त्यासाठी राज्यातील शिवसैनिक हे दसरा मेळाव्यासाठी रवाना होत आहे. नाशिकमधील शिंदे गटाचे मंत्री, खासदार आणि पदाधिकारी यांनी नाशिकच्या पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेत मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहेत. यामध्ये नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईला प्रस्थान करण्यापूर्वी श्री काळारामाचे दर्शन घेत या सर्व पादधिकाऱ्यांनी श्री रामाचा जयघोष करत शिवसेनेच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव आणि नाशिक शहरातून शिंदे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने जात असून त्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
या मेळाव्याकरिता शहरातून शिवसेनेने 25 हजार तर शिंदे गटाने 18 हजार शिवसैनिक नेण्याची तयारी केली असून अनेक बसेस मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
सर्व कार्यकर्ते बसमध्ये बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वतीने जाणाऱ्या बसेस या पाथर्डी फाटा येथून एकत्रित निघणार आहेत.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सर्व कार्यकर्ते बसमध्ये बसल्यावर विल्होळी येथील जैन मंदिरापासून एकत्रित मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने नाशिक शहरासह जिल्ह्यात शिवसेना उपनेते सुनील बागूल, बबनराव घोलप, वसंत गीते, महानगरप्रमुख सुधाकर बडगूजर, अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड यांसह इतर पदाधिकारी तयारी करत आहे.