मान्सून लांबल्यास ‘खिचडी’ला महागाईची फोडणी? तांदुळाचे भाव भडकण्याची भीती? गरज पडल्यास सरकार करु शकते निर्यातबंदी
यंदा उन्हाळ्याने भारताचा घामाटा काढला. त्याचा परिणाम भारतीय उन्हाळी पिकांवर ही झाला. गव्हाचे उत्पादन घटले, तर इतर पिकांना ही फटका बसला. गव्हाचे बंपर उत्पादन झालेले असताना ही भविष्याचा अंदाज घेत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली, आता या यादीत तांदळाचा क्रमांक लागण्याची दाट शक्यता आहे.
देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरुन तर राज्यात बंडाळीवरुन राजकीय पक्षांची आणि बंडखोरांची खिचडी शिजली आहे. त्यात आता महागाईची ही खिचडी (Khichadi) शिजणार आहे. अर्थात तुमच्या रोजच्या जेवणातील खिचडीला महागाईची (Inflation) फोडणी बसणार आहे. त्यामुळे तुमच्या तोंडाला चव आणणारी खिचडी मात्र काही दिवसांनी बेचव होण्याची शक्यता आहे. मान्सूनने (Monsoon) लवकरच खिचडी लावली नाही तर गव्हाप्रमाणेच तांदुळाची ही खिचडी शिजणार नाही आणि तांदुळ (Rice) सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर पोहचेल. जर ही खिचडी शिजू द्यायची नसेल तर सरकारला लवकरच गव्हाप्रमाणेच तांदुळावर बंदीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थात या शक्यता आहेत. आघाडीत बिघाडी होत असताना कडक उन्हाळ्याने आणि आता लांबलेल्या पावसाने गव्हु, साखरेपाठोपाठ तांदुळ (Wheat, Sugar and Rice) या प्रमुख पिकांची आघाडी मजबूत होऊ शकते आणि निर्यात बंदी येऊन देशातील भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो.
ग्राहकांच्या तांदुळावर उड्या
गव्हाच्या किंमती यंदा प्रचंड वाढल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. रोजच्या जेवणातील गव्हाचा वाटा कमी होत असून त्याऐवजी इतर पदार्थांचा वाटा वाढत आहे. त्यातही संध्याकाळी अनेक घरात हमखास खिचडी, फोडणीच्या भाताचा बेत शिजत आहे. गव्हाच्या तुलनेत स्वस्त असल्याने तांदुळावर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. भरपूर साठा आणि भरघोस उत्पादनामुळे तांदुळाच्या किंमती सध्या स्थिर आहेत. परंतू, ग्राहकांनी गव्हाऐवजी तांदुळावर असेच प्रेम सुरु ठेवले तर येत्या दिवाळीपर्यंत या साठ्यावर खाणा-यांचा दरोडा पडण्याची शक्यता आहे. त्यातच कडक उन्हाळ्याने अनेक ठिकाणी पिक पद्धतीवर परिणाम केला आहे. एवढंच कमी होत की काय, आता मान्सूनने जीव टांगणीला लावल्याने तांदुळाचा साठा कमी झाल्यास किंमती भडकण्याची शक्यता आहे आणि पर्यायाने सध्या सुरु असलेल्या तांदुळाच्या निर्यातीवर बंदी आणल्याशिवाय सरकारकडे पर्याय उरणार नाही.
भारताच्या निर्णयाचा मोठा परिणाम
भारताने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवर बंदी घातल्याने जागतिक बाजारात त्याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक देशांनी भारताला निर्यात बंदी हटवण्याची विनंती केली. तरीही सध्यस्थिती पाहता भारताला या निर्णयावर पुनर्विचार करणे सोपं नाही. तांदुळाचे जवळपास 90 टक्के उत्पादन आशिया देशात होते. त्यात भारताचा फार मोठा वाटा आहे. भारत हा मोठा निर्यातदार देश आहे. भारताची निर्यात 1.0 दशलक्ष टनांनी वाढून विक्रमी 22.0 दशलक्ष टन होण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी खात्याने वर्तवला आहे. थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या तांदळाच्यातीन मोठ्या निर्यातदारांच्या एकत्रित निर्यातीपेक्षा भारताची अंदाजित निर्यात जास्त आहे. निर्यातीत हा वाटा जवळपास 41% वाटा आहे.