‘शेतकरी लग्न, साखरपुडे करतात’ विधानावरून वाद, कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले, मी मस्करीत…
माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद झाला. आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना कर्जमाफीविषयी केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद पेटला. विरोधकांनी तर माणिकराव कोकाटे यांचा थेट राजीनामा मागितला आहे. त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मस्करीमध्ये बोललो. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असं कोकाटे म्हणाले आहेत. ते आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी शेतकरी कर्जमाफीतून लग्न, साखरपुडे करतात. शेतकरी पाच ते दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहतात, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं.
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रभू रामाकडे साकडं
“शेतकऱ्यांना शासनामार्फत नुकसानभरपाई मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांचं यापुढेही कमी नुकसान व्हावं, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणूनच रामजन्मभूमीचा मुहूर्त साधून आज मी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरात दर्शनास आलो होतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी मी प्रभू रामचंद्रासाठी समृद्धी आणि सुख मागितले आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांसाठी आगामी दिवस हे निश्चितच चांगले असतील, यावर माझा विश्वास आहे,” असं कोकाटे यांनी सांगितलं.
माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी
तसेच, काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान-सन्मान दुखावला असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कालदेखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते?
अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी केलेले असताना त्यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल विचारले होते. अजितदादा म्हणत आहेत, कर्जमाफी होणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्यांची तर कर्जमाफी होईल का? असा प्रश्न या शेतकऱ्याने केला होता. शेतकऱ्याच्या याच प्रश्नाचे उत्तर देताना, कर्ज घ्यायचं आणि पुढचे पाच-दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत वाट पाहायची, असं शेतकरी करतात. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयांचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल कोकाटे यांनी केला होता. तसेच शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या याच विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.