आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये, भाजपच्या बड्या नेत्याने केली खोचक टीका, कोण काय म्हणाल?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपच्या बड्या नेत्याने जहरी टीका केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतिसुमणं उधळली आहे.
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्याअगोदर मातोश्री येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाहीतर जेलमध्ये टाकतील असे म्हंटले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरुन राज्यात खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. त्यावरून भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. याच दरम्यान विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना सल्लाही दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असतांना विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये अशी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलतांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
सत्ता गेल्यानंतर शहाणपण येईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही अशीही जहरी टीका विखे पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे हे रडणारे नेते नाहीत, लढणारे नेते आहेत याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतिसुमणं उधळली आहे.
सत्ता गेल्याचं वैफल्य आदित्य ठाकरे यांना झालं आहे. त्यामुळे स्वतःलाच रडू आवरत नाही. आपल्या वक्तव्यावर थोडा आवर घातला पाहीजे. आपल्यापुढे अजून मोठं आव्हान आहे, मोठ्यांचा आदर करायला शिकलं पाहीजे असा राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
आपल्या वक्तव्यामुळे पप्पू होवू नये याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना देत असतांना राधाकृष्ण विखे पाटील यांचा रोख नेमका कुणावर होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका करत असतांना सल्ला ही दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. आदित्य ठाकरे बालिश आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर शिवसेनेसह भाजपच्या अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे खरंच बोलत असल्याचे सांगत त्यांच्या व्यक्तव्याचे समर्थन करत मुख्यमंत्री एकणाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.