Uday Samant : ‘आज तुम्ही जाब विचारायला….’ मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधी उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य
Uday Samant : कल्याण-डोंबिवली तसचं सोलापूरमधल्या घटनांमुळे महायुतीत धुसफूस वाढल्याचे संकेत मिळतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमातंर्गत मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येणार आहेत.
कोल्हापूर : “देशात मोदींच्या नेतृत्वात विकासात्मक काय बदल घडले हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोकांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच ठरवलं असावं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी सांघिकपणे काम करतायत. दोघांनी केलेल्या कामाची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने घेतली आहे. या सर्वेमुळे आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना-भाजप युतीचे हे सांघिक यश आहे” असं रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
“संकल्पना बदलण्यापेक्षा सरकार कसं चालतं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्रजी हे युतीमध्ये आमचे नेतेच आहेत. पाच वर्षे त्यांनी सक्षमपणे महाराष्ट्र चालवलाय. मागच्या अडीच वर्षात सगळीकडे स्पीड ब्रेकर होते” अशा शब्दात उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
दोघे दखल घेण्यासारखे प्रवक्ते आहेत का?
“देवेंद्रजींचा सल्ला आणि त्यांच्या अनुभवाचा एकनाथ शिंदे यांना उपयोग होतोय. दोघांमध्येही राजकीय परिपक्वता आहे. अंबादास दानवे, अतुल लोंढे हे दखल घेण्यासारखे प्रवक्ते आहेत का?” असा सवाल उदय सामंत यांनी केला. “एकनाथ शिंदेंवर टीका करून स्वतःची इमेज वाढवण्याची त्यांची ही केविलवाणी धडपड आहे” असं सामंत यांनी सांगितलं.
तुमच्याकडे जे चाललंय ते सांभाळा
“पूर्वीच सरकार फेसबुकवर चालणार सरकार होतं. मिठाचा खडा कुठेही पडलेला नाही. पडला, तर तो परतून लावण्याची आमच्यात ताकद आहे. आता रोज सामनातून राष्ट्रवादीला सल्ला दिला जातोय. आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, तुमच्याकडे जे चाललंय ते सांभाळा” असं उदय सामंत यांनी ठाकरे गटला प्रत्युत्तर दिलं. कल्याण-डोंबिवली तसचं सोलापूरमधल्या घटनांमुळे महायुतीत धुसफूस वाढल्याची चर्चा आहे.
आज जाब विचारु नका
“आमच्या युतीबद्दल तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. जाब विचारण्याचे परिणाम काय होतात ते 11 महिन्यापूर्वी महाराष्ट्राने पहिलय. त्यामुळे कोल्हापुरात ठाकरे गटाने जाब विचारू नये, विनंती करावी” असं उदय सामंत म्हणाले. “शासन आपल्या दारीला राजकीय कार्यक्रम म्हणणाऱ्यांनी एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावं. लोकांचं कसं प्रेम शिंदेंना मिळते ते पहावं. मुख्यमंत्री आणि सरकारला बदनाम करण्याचा हा कुटील डाव आहे” असं उदय सामंत म्हणाले. “कुठल्याही व्यक्तीने कुणाची हत्या केली असली तरी त्याच समर्थन होऊ शकत नाही. सदावर्ते यांनी काय करावं, हे सांगण्याएवढे आम्ही मोठे नक्कीच नाही” असं उदय सामंत म्हणाले.