मनोज गाडेकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 राहाता, अहमदनगर | 19 फेब्रुवारी 2024 : तुम्ही माझं ट्विटर आज ही चेक करा. मी सातत्याने पीयुष गोयल यांनी विनंती करतेय की एक धोरण ठरवा. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी भरडला जातोय, असं म्हणत आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदाप्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका केली. त्यांच्या या टीकेला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच त्यांनी सुप्रिया सुळेंना काही प्रश्नही विचारलेत.
सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याला मी महत्व देत नाही. त्यांचे वडील अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. शेती मालाच्या भावाला स्थिरता यावी म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले ते सांगावं. सूचना करणं सोपं आहे. मात्र जेव्हा सत्तेत असताना संधी होती. त्यावेळी मात्र शेतकरी दिसला नाही. आता भारत सरकारने आमची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील होते. यापुढे दलालांमार्फत खरेदी पेक्षा शेतकऱ्यांना थेट कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.
राधाकृष्ण विखे पाटीला यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असं म्हणत विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे.