अहमदनगरमध्ये पवारांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, कारण…; विखे पाटलांच्या विधानाने भुवया उंचावल्या
Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar and Ahmednagar Loksabha Election 2024 : शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सभा घ्याव्यात... राधाकृष्ण विखे पाटील असं का म्हणाले? त्यांच्या विधानाचा अर्थ काय? अहमदनगरच्या लोणीत बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांनी बाळासाहेब विखेंपासून विरोध करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेत्या-नेत्यांमध्ये त्यांनी भांडणं लावायचं काम केलं. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही. शरद पवारांनी अहमदनगर जिल्ह्यात जास्त सभा घ्याव्यात, हाच आमचा आग्रह आहे. त्यांनी जिल्ह्याचं कस वाटोळं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल. स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात आणि अवघे 10 उमेदवार तुम्हाला देता आले. काँग्रेसची हीच अवस्था आहे. स्वतःला नेते समजणाऱ्या थोरात यांना जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही. विखेंवर काय टीका करायची करा मात्र तुमच अपयश तुम्ही मान्य करा, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते अहमदनगरच्या लोणीत बोलत होते.
शरद पवारांवर निशाणा
अजित पवार आणि सोबतच्या लोकांच्या भूमिकेवर शरद पवारांनी टीका केली त्याला विखे पाटलांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांमध्ये कुठे सातत्य आहे… कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात कधी भाजपाला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात. काँग्रेसमधून विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची आणि ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पुन्हा पायाशी जाऊन बसायचं, असं विखे पाटील म्हणालेत.
तुम्हाला तुमच्या सोयीनुसार राजकारण करायची मुभा आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वकीय सोडून गेले. आता त्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्त्व देत नाही. खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा आहे, असं म्हणत विखे पाटलांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलंय.
बाळासाहेब थोरातांवर टीकास्त्र
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही विखे पाटलांनी टीका केली आहे. संपदा पतसंस्थेमुळे बाळासाहेब थोरात यांना वैफल्य आलं आहे. बँकेच्या चेअरमन 134 कोटींचा घोटाळा केला तो आज जेलमध्ये सुद्धा आहेत. तुमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये जातात याचा विचार बाळासाहेबांनी करावा. माझ्यावर आरोप करतात. त्यांच्याच नेतृत्वात एक समिती नेमून चौकशी करायला मी तयार आहे. माफीयांना पाठीशी घालून आम्ही राजकारण करत नाही, असं म्हणत विखे पाटलांनी थोरातांवर घणाघात केलाय.