कुणाल जायकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अहमदनगर | 28 जानेवारी 2024 : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. इंडिया आघाडीशी काडीमोड करत जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा एनडीएची वाट धरली आहे. नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. थोड्याच वेळात ते पुन्हा एकदा एनडीएचे नेते म्हणून बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या सगळ्यावर इंडिया आघाडीतून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या घटनाक्रमावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटूराम आहेत. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे, असं संजय राऊत म्हणालेत. छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, ते सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी बाहेर पडावं, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे.
राहुल गांधींची यात्रा का रोखता? जर तुमचा 400 पारचा नारा असेल तर घाबरता? राज्यात गुंडगिरीवर सुरू आहे. नवीन सरकार आल्यापासून अहमदनगरच्या आमदारांची गुंडगिरी वाढली आहे. अहमदनगरमध्ये गुंडांच राज्य सुरू झालं आहे. हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झालेत, असं म्हणत संजय राऊत यांनी संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे.
अहमदनगरमध्ये देवस्थानच्या जागा लुटल्या गेल्या आहेत. शैक्षणिक संकुलाच्या जागा इकडेच आमदार लुटत आहेत. त्यांनी निदान देवस्थानच्या जागा तरी सोडायला हव्या होत्या, असं म्हणत संजय राऊत संग्राम जगताप यांच्यावर जोरावर शाब्दिक हल्ला चढवला. या ताबा मारीवर आता छापामारी कशी करायची हे शिवसेनेला माहिती आहे. सरकारने ताबेमारी थांबवली नाही तर अहमदनगरच्या रस्त्यावर तमाशा होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.