अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, शिर्डी, अहमदनगर | 03 जानेवारी 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये आज राष्ट्रवादीचं शिबीर पार पडतं आहे. या शिबीरात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पक्ष आणि विचारधारा यावर भाष्य केलं. सध्याची परिस्थिती सकारात्मक आहे. ज्योतिबा फुले यांनी जो संघर्ष केला त्यांना ज्यांनी साथ दिली त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. हा विलक्षण योगायोग आहे. फुले दाम्पत्यांने आपल्याला दिलेला समतेचा विचार टिकवण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाषणाची सुरुवात केली.
सत्ता आणि राष्ट्रवादीची विचारधारा यावर जयंत पाटील यांनी शिर्डीच्या शिबिरात भाष्य केलं. आपण सत्तेत जास्त काळ राहिलो. त्यामुळं आपलं लक्ष जास्त सत्तेवर राहिलं. त्यामुळं आपल्या विचारांकडे, विचारधारेकडे दुर्लक्ष झालं. याचा परिणाम विचारधारेचा विचार न करता काहीजणांनी वेगळा निर्णय घेतला, असं म्हणत जयंत पाटील यांनी मनातील खंत बोलून दाखवली.
सर्व समाज फुले दाम्पत्य यांच्या विरोधात उभा राहिला. आता आपल्या देखील संघर्ष उभा राहिला आहे. 2024 च्या काळात आपल्याला संघर्षाला सामोरं जायचं आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा उल्लेख आम्ही करतो. त्याचा विचार मानतो. कारण शाहू यांनी देशात पहिल्यांदा आरक्षणाचा विषय मांडला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री पुरुष समानतेचा विषय मांडला. या दोघांनी दिलेला समतेचा विचार बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा चौकटीत मांडला. त्यामुळं आपण हा विचार घेऊन पुढे जात आहोत, असंही जयंत पाटील या शिबिरात बोलताना म्हटलं.
सध्या समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड होतं आहे. त्यामुळं आपला आवाज कमी पडतं आहे. त्यामुळं आपण बोललं पाहिजे. आपण शाहू फुले आंबेडकर यांचा विचार तळागाळात घेऊन जायचं आहे. हा विचार महत्वाचा आहे. तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.
खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे.पण अमोल कोल्हे यांना पाडण्याचा विडा काही जणांनी उचलला आहे. माञ अमोल कोल्हेजी… काळजी करू नका. आता संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे. आता आपण लढायचं, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.