निलेश लंकेच्या टीकेला आम्ही मीडियातून नाही तर…; सुजय विखे नेमकं काय म्हणाले?
Sujay Vikhe on Nilesh Lanke and Loksabha Election 2024 : अहमदनगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर टीका केली आहे. तसंच लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे. सुजय विखे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. तसंच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणं पसंत केलं आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देताना सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी सुजय विखे यांच्यावर टीका केली. विखेंनी आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. आमच्या विकास कामात विखेंनी नेहमी अडथळा आणला, असं लंके म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याबाबत सुजय यांना विचारण्यात आलं. तेव्हा लंकेंनी राजीनामा का दिला. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही. त्यांनी सभेदरम्यान जे आरोप केले. त्याचं उत्तर मीडियाच्या माध्यमातून नाही तर सभेतून उत्तर देऊ…आमचे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील, असं सुजय विखे म्हणाले.
लंकेच्या उमेदवारीवर सुजय विखे म्हणाले…
निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे लंकेशी लढत असल्याने काही आव्हान वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा समोरून कुणीही उमेदवार असला तरी मी माझी रणनीती बदलत नाही. मी माझ्या कामाच्या आधारावर जनतेसमोर जाणार आहे. मी कधीही कुणाला कमी लेखात नाही. समोर कोण आहे, त्यावरून रणनीती बदलत नाही. मी जी रणनीती ठरवली आहे. त्यानुसार मी काम करतो. तसंच काम करत राहणार आहे, असं सुजय विखेंनी म्हटलं.
बाळासाहेब थोरातांवर अप्रत्यक्ष निशाणा
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता खासदार सुजय विखे यांनी टोला लगावला आहे. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात मैदानात उतरणार असल्याचं बोललं जातं आहे. यावर सुजय विखे यांनी टीका केली आहे. तर मागच्या वेळेस हे सगळे प्रयोग झाले. सगळे मैदानात उतरून भाषणं झाली. मात्र जे माणसं आता मैदानात उतरणार आहे. त्यांनी एकातरी माणसाचं जीवन बदलण्यासाठी एखादं काम केलं असेल तर त्यांचं जनता का ऐकणार आहे?, असा टोला सुजय विखे यांनी लगावला आहे.
महायुतीतील नाराजीवर म्हणाले…
नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना निवडणूकीला अजून भरपूर वेळ आहे. अजून फॉर्म भरायचे आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक गोष्टी बदलतात. ही महायुती केवळ पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी झालेली महायुती आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं एकमत आहे, असं सुजय विखे म्हणाले.