Sanjay Raut | आमचे कितीही नेते फोडा जनता आमच्यासोबत, संजय राऊत यांचा पलटवार
Sanjay Raut | राज्यात आमचे किती पण नेते फोडा, जनता आमच्यासोबत असल्याचा पलटवार खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपशी घरोबा केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण सज्जन माणूस, पण भीतीने भाजपमध्ये गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चंदन पुजाधिकारी, शिर्डी | 14 February 2024 : राज्यात आमचे किती पण नेते फोडा, जनता आमच्यासोबत असल्याचा पलटवार उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. ज्यांच्यावर आरोप झालेत ते भाजपमध्ये गेले. कोण नाराज आणि कोण खुश आहे हे तपासण्यासाठी काखेत मशीन लावणार आहे का ? असा खोचक सवाल त्यांनी केला. भाजप सध्या घाबरलेले आहे. त्यांना 200 जागा जिंकण्याची पण शक्यता वाटत नसल्याचा टोल त्यांनी हाणला.
संपूर्ण राज्यात दौरा
संपूर्ण राज्यात दौरा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आता धाराशिवला पण जात आहे. महाविकास आघाडी एकत्रित दौरा सुद्धा करणार आहे. या दौऱ्यात आघाडीतील सर्व पक्ष असतील. त्यात वंचित ही असणार आहे. दौऱ्यांना लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.लोकशाहीची हत्या भाजपने केली. रावणाने सीता पळवली त्याच्या भूमिकेत भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला.
जनता आमच्यासोबत
आमचे कितीही नेते फोडा जनता आमच्यासोबत, असल्याचा दावा राऊत यांनी केला. शिवसेनेने महाराष्ट्रासाठी झोकून दिले आहे. 30 जागांवर महाराष्ट्रात बहुमत असेल, लोकसभेत आमच्या 10 जागा जास्त असतील. ही लोकसभेची तयारी आहे. शिर्डी मतदार संघावर काँग्रेसने दावा सांगितला नाही. ज्यांनी सांगितला ते भाजपात गेले, असा दावा त्यांनी केला.
मोदी-शाह लपून बसतील
शेतकरी खवळल्याने मोदी आणि शाह लपून बसतील असा टोला त्यांनी हाणला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणे ही चिथावणी आहे का, असा सवाल पण त्यांनी केला. याच प्रश्नावर तुम्ही निवडणुका लढविल्या स्वामिनाथन यांना भारतरत्न देत आहे पण त्यांच्या शिफारसी लागू करत नाही, यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
ते तर सज्जन
अशोक चव्हाण सज्जन माणूस होता. पण ते भीतीपोटी भाजपमध्ये गेल्याचा टोला राऊत यांनी लगावला. चव्हाण यांनी मोठी चूक केल्याचे राऊत म्हणाले. आमचे 40 लोक पण गेले. अजित दादाचं सगळं बनावट आहे. शिवसेना आणि जनता यांच्यात व्हॅलेंटाइन आहे.माझा हा दौरा म्हणजे ही लोकसभेची तयारी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.