‘वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही’, मंत्री धनंजय मुंडेंचा विरोधकांना इशारा, सारंगी महाजन यांच्या आरोपावर म्हणाले काय?
Minister Dhananjay Munde Big Claim : गेल्या दीड महिन्यांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांना पण लक्ष करण्यात आले आहे. आज मुंडे यांनी विरोधकांना असा खणखणीत इशारा दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या दीड महिन्यांपासून बीडचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वाल्मिक कराड याच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांना पण लक्ष्य करण्यात आले. प्रकरणात अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांनी याप्रकरणावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या नाहीत. पण राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील अधिवेशनासाठी आले असताना त्यांनी मोठे वक्तव्य केले. ‘वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही’, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. त्यांनी सारंगी महाजन यांच्या वक्तव्याचा पण समाचार घेतला.
अजितदादांना पालकमंत्रीपदासाठी विनंती
मीच अजितदादांना बीडच्या पालकमंत्री पदासाठी विनंती केली, असे मुंडे म्हणाले. बीडची सध्याची स्थिती पाहून मीच दादांना तशी विनंती केली. जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा, ही माझी भावना आहे, असे ते म्हणाले. तर साईबाबांच्या दर्शनाने नवी उर्जा मिळते. त्याच उर्जेतून आम्ही काम करतोय, असे शिर्डीतील पक्षाच्या समारोपीय सत्रासाठी आले असताना ते म्हणाले.




बीडची बदनामी नको
संतोष देशमुख यांच्या हत्येचे कोणी समर्थन करू शकत नाही. याप्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर लटकवा, अशी मागणी त्यांनी केली. पण यामुळे बीडमध्येच नाही तर मराठवाड्यात जो सामाजिक सलोखा बिघडला आहे. बीडची बदनामी करू नका असे आवाहन त्यांनी केले.
माझ्यावरचा आरोप सिद्ध करून दाखवा
विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केले. धनंजय मुंडे पहिल्यांदाच परखडपणे बोलल्याचे दिसून येत आहे. मला आत्ता यावर काही बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. आत्ताची परिस्थीती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचंय तर करा मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका अशी विनंती आरोप करणाऱ्यांना धनंजय मुंडे यांनी केली आहे.
सारंगी महाजन यांचे आरोप फेटाळले
वाल्मिक कराड यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप खोटे आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यांनी विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले. तर दुसरीकडे सारंगी महाजन यांच्या आरोपांना सुद्धा त्यांनी उत्तर दिले. या आरोपात काही तथ्य नसल्याचे ते म्हणाले.