मराठा आरक्षण दिलं नाही तर हिवाळी अधिवेशन बंद पाडणार; अजित पवार यांच्या शिलेदाराचा सरकारला इशारा

| Updated on: Oct 28, 2023 | 1:10 PM

MLA Nilesh Lanke on Maratha Reservation : मराठा आरक्षण देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. शिवाय आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे. अजित पवार गटातील आमदार आरक्षणप्रश्नी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काहीही करा, पण मराठ्यांना आरक्षण द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मराठा आरक्षण दिलं नाही तर हिवाळी अधिवेशन बंद पाडणार; अजित पवार यांच्या शिलेदाराचा सरकारला इशारा
Follow us on

रणजित जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी पिंपरी चिंचवड | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली. या 40 दिवसात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अन् आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केली. पण सरकारकडीन याबाबत कोणताही निर्णय आला नाही. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. राजकीय नेतेही आरक्षणप्रश्न आक्रमक झाले आहे. विरोधकांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. अशातच अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षण मिळालं नाही तर मराठा आमदाराकडून हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याची तयारी आमदार निलेश लंके यांनी दर्शवली आहे. राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा कार्यकर्ते उपोषण करत आहेत. मावळमधील कार्ला इथेदेखील ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. यावेळी याठिकाणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा लंके यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मात्र आमदार निलेश लंके जेव्हा कार्ला इथल्या उपोषणस्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांनी रोखण्यात आलं नाही. मावळ वासीयांनी त्यांना कोणत्याच प्रकारचा विरोध केला नाही. आमदार लंके यांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. यावेळी आमदार लंके यांनी मराठा आरक्षण मिळालं नाही. तर सर्व मराठा आमदार मिळून हिवाळी अधिवेशन बंद पाडू, असं निलेश लंके म्हणाले. त्यांनी उपोषणकर्त्यांना विश्वास दिला.

मराठा आरक्षणवरून पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. बारामतीतही आंदोलन करण्यात आलं. मराठा कोअर कमिटीतील राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्या. राजीनामे दिल्याशिवाय राजकीय जोडे बाजूला राहणार नाहीत. आजच पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे द्यायला सुरुवात करा, असं आवाहन आंदोलकांनी यावेळी केलं आहे.