Sharad Pawar : चौकशी होऊन जाऊ द्या, शरद पवार यांचे सिंचन घोटाळ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन, म्हणाले…
Sharad Pawar On PM Modi : नागपूरमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्यावरुन पुन्हा निशाणा साधल्यानंतर आज, शरद पवार यांनी पण तोफ डागली. मोदी यांनी यापूर्वी पण सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. तो कुणावर केला होता, असा सवाल करत आज ते तर त्यांच्यासोबत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
नागपूरमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्यावरुन पुन्हा एकदा आरोपांची राळ उडवली. शरद पवार यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. सिंचन घोटाळ्यावरुन मोदींनी पुन्हा आरोप केलेत का? असा सवाल करत, जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी यापूर्वी सुद्धा भोपाळच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळ्यावरुन आरोप केले होते, त्याचे पुढे काय झाले. त्यांनी त्यावेळी कुणाचे नाव घेतले, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. ज्यांचे नाव घोटाळ्यात घेण्यात आले, ते आज मोदींसोबत फिरत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. अहमदनगरमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत स्पष्ट केले.
भोपाळच्या सभेत काय केला होता आरोप
जवळपास 10 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. एनसीपीवर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी ही यादी न थांबणारी असल्याचा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला होता. या आरोपानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. आता अजित पवार हे महायुतीतील घटक आहेत.
चौकशी होऊ द्या
सिंचन घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमका कुणावर केला, हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन शरद पवार यांनी केले. सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, आमची काहीच हरकत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पण ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले, ते त्यांच्यासोबतच हिंडत असल्याचा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिंचन घोटाळा हा मुद्दा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शाह यांच्यावर पण टीका
अमित शाह यांच्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. शरद पवार यांनी सत्ता असताना काय केले असा सवाल त्यांनी विचारला होता. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात अमित शाह सत्तेत आहेत, त्यांनी या दहा वर्षांत काय केले याचं उत्तर द्यायला हवं, असा टोला त्यांनी हाणला.