अजित दादा यांचा ‘तो’ दावा, आता त्यावरून कुणी केला नवा वाद?
अजितदादा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी अजितदादा काय बोलले याचा हा व्हिडीओ आहे. आता त्याच अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर आता दावा सांगितला आहे. तोच व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केलाय.
मुंबई | 2 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना कुणाची? या वादानंतर एकाच वर्षात आता राष्ट्रवादी कुणाची? हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालाय. शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सांगितला. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी सात महिन्यांपूर्वीचा अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट करून त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले. त्यावेळी अजितदादा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी अजितदादा काय बोलले याचा हा व्हिडीओ आहे. आता त्याच अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर आता दावा सांगितला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर अधिकार कसा काय असू शकतो? असा प्रश्न स्वतः अजित पवारच उपस्थित करत होते. तोच व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्न केलाय.
अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणतात, ‘अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला. ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला. जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूर लोकांपर्यंत पोहचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला? त्यांचं चिन्ह काढून घेतलं? हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का? याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं?
ज्या अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंना सूचित केलं की तुम्ही असा पक्ष कसा काय घेऊ शकता? तुम्ही नवीन पक्ष काढा. नवीन चिन्ह घ्या. तो बाळासाहेबांचा पक्ष आहे. आता तेच अजित पवार राष्ट्रवादीवर दावा सांगत आहेत. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘दुसऱ्या देई ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असं होता कामा नये असा तोल लगावलाय.
दादा तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वतःची ओळख करून देताना म्हणत आलात की मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. शिवसेना फुटल्यानंतर एका भाषणात आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्रिमंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिला. पक्ष वाढला पवार साहेबांमुळेच मग जसं आपण म्हटलात तसं करा. एक नवीन पक्ष काढा.नवीन निशाणी घ्या आणि स्वतःच कर्तृत्व सिद्ध करुन दाखवा, असे आव्हाड म्हणाले आहेत.
यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘नाही हे बघा स्वतःचा पक्ष काढणं न काढणं हा भाग वेगळा आहे. ज्या पक्षात कष्ट करून पक्ष काम वाढवतो आपण त्याबद्दल आपल्या एक वेगळ्या भावना असतात.’ असे म्हटलंय.
सात महिन्यांपूर्वी जेव्हा अजित पवार महाविकास आघाडीत होते. तेव्हा शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच असल्याचं अजित पवारांनी वारंवार म्हटलं होतं. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिल्यानंतरही पक्षाचे खरे मालक उद्धव ठाकरेच असल्याचं अजित पवारांनी सभेतून म्हटलं. मात्र आज जेव्हा हीच वेळ अजित पवारांवर आली. तेव्हा मात्र त्यांनी राष्ट्रवादीवर आपलाच दावा सांगितलाय.
अजित पवार यांनी यामागचे कारण सांगताना चिन्ह आपल्याकडे राहायचं आहे. पक्षही आपल्याकडे राहायचं आहे. त्याला कुठंही दृष्ट लागून द्यायची नाही. आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय. राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली. ती परत आपल्याला मिळवायची आहे, असे म्हटले.
दुसरी गोष्ट म्हणजे अनिल देशमुखही आमच्या सोबत येणार होते. मात्र भाजपनंच त्यांच्यावर आरोप केलेले असल्यानं त्यांना मंत्री करण्यास भाजपचा नकार आला. म्हणून अनिल देशमुख आमच्या सोबत न आल्याचा दावा अजित पवारांनी केला. मात्र, भाजपनं स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यावरही आरोप केले होते. पण तेच आज भाजपसोबतच्या सत्तेत मंत्री असल्यानं अजित पवारांच्या दाव्यावर प्रश्न उभे होत आहेत.