धनंजयने संधीचं सोनं केलं, पंकजांसारख्या मंत्र्यांना हरवलं, आता नाहक बदनामी का? : अजित पवार
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी त्यांची तक्रार मागे घेतल्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. (Ajit Pawar Dhananjay Munde)
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. “राजकीय क्षेत्रात काम करत असताना तर नाव कमवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. मात्र, बलात्कारासारखे आरोप झाले की एका झटक्यात त्या व्यक्तीची बदनामी होते. लोकांचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. विरोधक हा मुद्दा लगेच हाताशी धरतात. कित्येक महिला संघटना आंदोलन सुरु करतात. मात्र आता सत्य समोर आलं आहे, धनंजय मुंडे यांच्याविषयी अनेक वक्तव्यं केली गेली; त्याला जबाबदार कोण?, असा सवाल अजित पवार यांनी केला. (Ajit Pawar comment on rape allegations on Dhananjay Munde)
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी मुंडे यांनी पाठराखण केली आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मार्गासंदर्भात अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पक्षाचीही बदनामी झाली
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांना नाहक बदनाम करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं, अजित पवार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत कॅबिनेटमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचा पराभव केला. त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं. जिंकल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीने मंत्रिपद दिलं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत होते. मात्र, मागील 8 दिवसांपासून त्यांना भयंकर त्रास दिला गेला. अशा प्रकारामुळे पक्षाची बदनामी होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खुद्द मलाही अनेक प्रश्न विचारले गेले. आमच्यावर धनंजय मुंडे यांना पाठिशी घालण्याचा आरोप केला गेला. मात्र आम्ही फक्त निष्पक्ष चौकशीची मागणी केली, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. तसेच, अशा प्रकराच्या आरोपांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. हा जो त्रास झाला त्याला कोणी वाली आहे का?,” असा घणाघाती सवाल त्यांनी केला.
कोणावरही असा आरोप होऊ नये
दरम्यान, शेवटी बोलताना अजित पवार यांनी अशा प्रकारामध्ये संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. एखादी व्यक्ती राजकारणात काम करत असताना त्याला प्रचंड योगदान द्यावं लागतं. रात्र आणि दिवस काम करावं लागतं. अशा प्रकारचे आरोप झाल्यानंर त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य नेस्तनाबूत होतं, त्यामुळे अशा प्रकारांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Dhananjay Munde Case: अॅड. रमेश त्रिपाठींनी रेणू शर्मांची केस सोडली, तक्रार मागे घेताच निर्णय
…म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्या उमा खापरेंचा मोठा गौप्यस्फोट
(Ajit Pawar comment on rape allegations on Dhananjay Munde)