अजितदादांची कामं पाहता बारामतीत त्यांचा पराभव करणं निव्वळ आशावाद : चंद्रकांत पाटील
पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
बारामती : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये बारामती विधानसभा हे आमचे टार्गेट नाही, तर 2024 मध्ये बारामती लोकसभा हे आमचे टार्गेट आहे, असं स्पष्ट केलं. शिवाय बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेली कामे पाहता, 2019 मध्ये त्यांचा पराभव करणे हा निव्वळ आशावाद आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.
पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
“पिंपरीला जे मी म्हटलं ते चुकीचं छापलं गेलं. मी असं म्हटलं की 2019 मध्ये बारामती विधानसभा आमचं टार्गेट नाही. 2024 ची लोकसभा हे आमचं टार्गेट आहे. पुढे मी असंही म्हटल, जे नॉर्मली राजकारणी उच्चारत नाही, मी वेगळ्या प्रकाराचा राजकारणी आहे. मी म्हणालो, बारामतीमध्ये अजितदादांनी एकूण केलेली कामं पाहता, तिथे 2019 पराभूत करतो असं म्हणणं आशावाद आहे. मी असं म्हटलं 2024 ची बारामती लोकसभा हे आमचं टार्गेट आहे. त्यामुळेच मी दर आठवड्याला इथे यायचं ठरवलं आहे. लोकांची कामं करुन भाजपबद्दल विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही करेन” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
2019 ची बारामती विधानसभा टार्गेट नाही. त्यामुळे माझं विधान योग्यरित्या छापा, ज्यामुळे अजितदादांनाही थोडं बरं वाटेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
अजितदादांची कामं पाहता बारामतीत त्यांचा पराभव करणं निव्वळ आशावाद : चंद्रकांत पाटील https://t.co/IbMNt2LG9Z @ChDadaPatil @AjitPawarSpeaks pic.twitter.com/K2eE7CoZjh
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2019