शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

| Updated on: Dec 12, 2024 | 10:53 AM

शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांशी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल भाष्य केले.

शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Follow us on

Ajit Pawar Reaction After Sharad Pawar Meet : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी दाखल झाले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. या भेटीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांशी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल भाष्य केले.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार हे घराबाहेर पडल्यानतंर पत्रकारांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. त्यावेळी अजित पवारांनी भेट घेण्यामागचे कारण काय? त्यांच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अजित पवारांनी भाष्य केले. आम्ही इन जनरल विषयांवर चर्चा केली. चहा, पाणी, नाश्ता केला आणि निघालो, असे अजित पवार म्हणाले.

“महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा”

आम्ही शरद पवारांसोबत अनेक विविध विषयांवर चर्चा केली. इथे काय सुरु आहे, तिथे काय सुरु आहे, अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. परभणीला काय घडलं यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो. इन जनरल चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, अधिवेशन केव्हा आहे, यावरही चर्चा केली. चहा पाणी नाश्ता झाला, आता निघालो, असे अजित पवारांनी म्हटले.

“राजकीय चर्चा झाली”

शरद पवारांसोबत राजकीय चर्चा झाली. आमच्या तिघांचा शपथविधी झाला. बाकीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार, १६ तारखेला हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे तेव्हा कामकाज करण्यासाठी मंत्रिमंडळाची आवश्यकता असते. यावरही चर्चा झाली. येत्या १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे अजित पवार म्हणाले.

“शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो”

आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. १२ डिसेंबरला सर्वजण भेटत असतात. साहेबांचे दर्शन घेतात. शुभेच्छा देतात. आम्हीही त्यासाठी आलो होतो, असेही अजित पवारांनी म्हटले.

दरम्यान आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांनी ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासह दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. यानंतर त्यांच्यात साधारण तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील कटुता दूर झाल्याचे म्हटलं जात आहे. तसेच यामुळे पवार कुटुंबिय एकत्र येणार असल्याचे राजकीय संकेतही पाहायला मिळत आहेत.