कट्टर विरोधक एकत्र, अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे एकाच मंचावर
बारामती (पुणे) : मागील अनेक वर्षांच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन नेते आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येत आहेत. गुरुवारी (दि. १८ एप्रिल) इंदापूर तालुक्यातल्या भिगवण, पळसदेव, निमगाव केतकी आणि सणसर येथे सभा होत असून, या दोन नेत्यांबरोबरच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे […]
बारामती (पुणे) : मागील अनेक वर्षांच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन नेते आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येत आहेत. गुरुवारी (दि. १८ एप्रिल) इंदापूर तालुक्यातल्या भिगवण, पळसदेव, निमगाव केतकी आणि सणसर येथे सभा होत असून, या दोन नेत्यांबरोबरच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हेही या सभांना उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवार-पाटील यांच्यात मनोमिलन झालं आहे. त्यानंतर प्रथमच हे दोन्ही नेते इंदापूर तालुक्यात एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळं हा सध्या चर्चेचा विषय ठरला असून, गुरुवारी होणाऱ्या सभांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील.. एकाच जिल्ह्यातले हे दोन वजनदार नेते.. गेली अनेक वर्ष पक्ष वेगवेगळे असले तरी एकाच सरकारमध्ये या दोघांनीही मंत्री म्हणून एकत्र काम केलं आहे. पण या दोन्ही नेत्यांचं कधीच जमलं नाही. विधानसभेसह अन्य निवडणुकांमधील विरोध, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील संघर्ष असं बरंच काही इंदापूर तालुक्यात घडलं. आघाडी असली तरी इथलं शह-काटशहाचं राजकरण कधीही थांबलं नाही.
मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादीनं हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवलं. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. तेव्हापासून पवार-पाटील यांच्यातील संघर्ष अधिकच वाढला. मागील दोन-तीन वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र काम करत असतानाही इंदापूरमध्ये मात्र वेगळंच चित्र पहायला मिळालं.
वर्षभरापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीसह देशातील समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही या दोन्ही पक्षांसह अन्य समविचारी पक्षांची महाआघाडी झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं आघाडीचं काम करुनही विधानसभा निवडणुकीत प्रत्येकवेळी कुरघोडी होत असल्यानं यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांसमोरच आपली कैफियत मांडत, आघाडीच्या उमेदवारांचं काम करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यातच मध्यंतरी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी या विषयात लक्ष घालत हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी चर्चा करुन व्यवहार्य मार्ग काढण्याची भूमिका घेतली.
ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना विश्वासात घेतलं.
या सर्व घडामोडींनंतर हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करत आम्ही आघाडीचा धर्म पाळत सुप्रिया सुळेंना इंदापूरमधून अधिकचं मताधिक्य देऊ असं जाहीर केलं. मात्र राष्ट्रवादीनंही आघाडी धर्म पाळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यानंतर नुकतीच इंदापूर तालुक्यातल्या बावडा या गावी हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत विराट सभा पार पडली.
आता गुरुवारी इंदापूर तालुक्यातल्या भिगवण, पळसदेव, निमगाव केतकी आणि सणसर इथं अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या वैरत्वाला विसरुन हे नेते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त एकत्र येत असल्यानं चर्चेचा विषय ठरला आहे.